“महागाईचा भडका उडणार?” हूथी बंडखोरांमुळे भरली जगाला धडकी
इस्त्रायल विरुद्ध हमास युद्ध. एक देश विरुद्ध एक संघटनेतील हे युद्ध जगावर महाभंयकर परिणाम करत आहे. आर्थिक, व्यापारी, वैद्यकीय आणि दळणवळण अशा अनेक गोष्टींवर या युद्धाचे परिणाम जाणवत आहेत. याच युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयावरच्या मूल्यावरही परिणाम होऊन जगात महागाईचा भडका उडणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांना आता आणखी एक आधार मिळाला आहे तो म्हणजे याच युद्धाचा भाग असलेले हूथी बंडखोर. (Inflation in the world in the Houthi rebels world)
कोण आहेत हूथी बंडखोर?
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने जंगजंग पछाडले आहे. पण त्याचवेळी या युद्धामुळे हूथी बंडखोरही आक्रमक झाले आहेत. हूथी हा येमेनमधील शिया मुस्लीम समुदायाचा एक सशस्त्र अतिरेकी गट आहे. 1990 मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हुसैन अल हूथी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्या नावावरुव या संघटनेला हूथी हे नाव मिळाले.
हूथी बंडखोरांना शिया मुस्लीम असलेल्या इराणचा पाठिंबा आहे. तर येमन सरकारला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती अशा अरब देशांचा पाठिंबा आहे. या दोन्ही गटांमधील नागरी युद्ध मागील दोन दशकांपासून सुरु आहे. इराणच्या पाठिंब्याच्या जोरावर हूथी बंडखोरांनी राजधानी सना शहरासह बहुतांश उत्तर येमेन 2014 पासून आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहे. सुन्नी असलेला सौदी अरेबिया हा इराण आणि हूथी बंडखोरांचा सामाईक शत्रू आहे.
हूथी बंडखोरांंचे हल्ले :
सहाजिकच हूथी अमेरिका आणि इस्राइलचाही तिरस्कार करतात. इस्त्रायलने हमासविरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर हूथी बंडखोर पहिल्या दिवसापासून इस्त्रायल विरोधात मैदानात उतरले आहेत. हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात युरोप आणि अमेरिकेच्या जहाजांवर हल्ले सुरु केले आहेत. या हल्ल्यांसाठी ड्रोन किंवा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. जहाजाच्या कप्तानांना रेडिओद्वारे धमकावले जाते, यामुळे अनेक जहाजे लाल समुद्रातील सुएज कालव्याचा मार्ग सोडून देत आहेत.
हूथी बंडखोरांमुळे जगात महागाई का वाढणार?
वास्तविक लाल समुद्रातील सुएझ कालवा हा युरोप आणि आशिया या दोन खंडांना जोडणारा हा व्यवहार्य सागरी मार्ग आहे. जगातील जवळपास 15 टक्के व्यापार याच मार्गावरुन होतो. या मार्गावरुन कच्चे तेल, वायू अशा वस्तू युरोपला पोहोचविल्या जातात आणि युरोपातूनही आशियामध्ये मालाची निर्यात केली जाते. पण या मार्गावरील हल्ल्यांमुळे यामुळे जगातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी, ‘मायर्क्स’सह जर्मनीच्या हॅपल-लॉइड कंपनी आणि इतर कंपन्यांनी लाल समुद्रातून सर्व कंटेनरची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकांनी आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप या बंदराला वळसा घालून जुन्या सागरी मार्गाने पुढे यावे लागत आहे. हा मार्ग खर्चिक तर आहेच शिवाय वेळखाऊ देखील आहे. या मार्गावरुन व्यापार करायचे म्हंटल्यास 10 ते 15 दिवसांचा वेळ जास्तीचा लागतो. याशिवाय रिस्क घेऊन लाल समुद्रामार्गे येणाऱ्या जाहजांचा विमा दुप्पट महागला आहे. इस्रायली जहाज कंपन्यांना तर 200 टक्क्यांहून अधिक रक्कम जास्तीची मोजावी लागत आहे. या सर्व वाहतुकीचा, इंधनाचा आणि विमा रक्कमेचा भार देशातील सरकारवर आणि पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांवर येऊ शकतो. हेच एक महागाई वाढण्याचे महत्वाचे कारण ठरु शकते.
हूथी बंडखोरांच्या बंदोबस्तासाठी अमेरिकेने पावले उचायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने या भागात युद्दपोत तैनात केले आहेत. शिवाय यूके, कॅनडा, फ्रान्स, बहारिन, नॉर्वे, स्पेन यांनीही यात अमेरिकेला साथ दिली आहे. या देशांच्या युद्धनौकांनी लाल समुद्रात गस्त वाढविली आहे. नेदरलँड्स, डेन्मार्क यांनीही सहकार्याची तयारी दाखविली आहे. यामुळे हूथी बंडखोरांचा लवकरात लवकर बिमोड होणे गरजेचे आहे, अन्यथा एका बाजूला इस्त्रायल-हमास युद्ध आणि दुसऱ्या बाजूला हूथी बंडखोरांचे हल्ले. यामुळे महागाई भडका उडणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.