CBI Arrests CGST Officials : पनवेलमधील पुनर्विकास प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने सीजीएसटीच्या लँड अँड बिल्डिंग विभागातील अधीक्षक पंकज कुमार ऊर्फ पंकज राजपूत आणि सीजीएसटी सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना अटक केली. खासगी रिअल इस्टेट कंपनीच्या प्रकल्पप्रमुखाने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
नवीन पनवेल सेक्टर-17 मधील दोन इमारतींचा पुनर्विकास के. टी. रियल्टी या कंपनीकडून सुरू आहे. या इमारतींमधील 24 सदनिका सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, रायगड आयुक्तालयाच्या मालकीच्या आहेत. स्थानिक प्राधिकरणाच्या आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर पुनर्विकासासाठी सदनिका ताब्यात देणे आणि प्रकल्पाला एनओसी देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी झाल्याचा आरोप आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयने कारवाई केली.
गुरुवारी (ता. 10) लाचेची रक्कम तीन टप्प्यांत देण्याचं ठरल्याचं तपासात समोर आलं. त्यानुसार 10 लाख रुपये रोख, 20 लाख रुपये आरोपी अधिकाऱ्याने खरेदी केलेल्या सदनिकेच्या डाऊन पेमेंटसाठी, तर उर्वरित 70 लाख रुपये नवी दिल्लीतील सीजीएसटीच्या महासंचालक मानव संसाधन विकास (डीजी एचआरडी) आणि अन्य अधिकाऱ्यांसाठी नंतर देण्याची मागणी करण्यात आली होती. अधीक्षक पंकज कुमार याने 10 लाख रुपये सल्लागार प्रसाद कुमार स्वामी याच्याकडं देण्यास तक्रारदाराला सांगितलं होतं.
तक्रारीनंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाच्या तपासातून सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील आणखी काही अधिकारी चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.
