1 कोटींची लाच मागितली, 50 लाख स्वीकारताना पकडले; कार्यकारी अभियंत्यासह पाच जण अटकेत
CPWD: या प्रकरणात कार्यकारी अभियंत्याचा नातेवाईक 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना CBIच्या जाळ्यात अडकला.
मुंबई : राज्यात भ्रष्टाचाराचा भस्मासूर झाला असल्याचे अनेक प्रकरणे घडत आहेत. वडाळा येथील भूखंडासाठी एनओसी (NOC) देण्याच्या बदल्यात तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. मागणी केलेली लाचेची रक्कम अखेर 70 लाख रुपयांवर निश्चित झाली होती. त्यापैकी 50 लाख रुपये स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.
या प्रकरणात कार्यकारी अभियंत्याचा नातेवाईक 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना CBIच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत कार्यकारी अभियंत्यासह इतर आरोपींनाही अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतील एका रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष, मॅनेजर तसेच एनओसीसाठी अर्ज करणाऱ्या कंपनीचा पार्टनर यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
एनओसी देण्यासाठी मागितली होती लाच
वडाळ्यातील भूखंडासाठी NOC देण्याच्या बदल्यात सुरुवातीला 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर ही रक्कम 70 लाख रुपयांवर ठरली. त्यापैकी 50 लाख रुपये तत्काळ आणि उर्वरित 20 लाख रुपये आठवड्यानंतर देण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे, 50 लाख रुपयांच्या व्यवहारादरम्यान आरोपींना पकडण्यात आले. CBIने लाचेची 50 लाख रुपयांची रक्कम जप्त केलीय.
डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद न करता ना हरकत दिल्याचा आरोप
तपासात भूखंडासाठी देण्यात आलेल्या ना हरकत (NOC) ची डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली नसल्याचेही समोर आल्याचे तपास यंत्रणेने सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, CBIने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील आरोपींशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत लाचेच्या 50 लाख रुपयांव्यतिरिक्त आणखी 53.87 लाख रुपयांची रोकड तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.