E20 पेट्रोल सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात केजरीवालांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा

E20 Petrol Policy Kejriwal March PM Modi Residence अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानाकडे मोर्चा काढणार

E20 Petrol Policy विरोधात अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर शांततापूर्ण मोर्चा काढणार

E20 Petrol Policy विरोधात अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर शांततापूर्ण मोर्चा काढणार

E20 Petrol Policy Kejriwal March PM Modi Residence: पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या म्हणजेच E20 धोरणाच्या सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. या मुद्द्यावरून AAPचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाकडे शांततापूर्ण मोर्चा काढणार आहेत. यावेळी E20 पेट्रोलची सक्तीने अंमलबजावणी करू नये, या मागणीसाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या याचिका पंतप्रधानांकडे सादर केल्या जाणार आहेत.

Chandipura Virus आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

AAPने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या मोर्चाची माहिती दिली. “लाखो नागरिकांचा कौल घेऊन अरविंद केजरीवाल 100 लोकांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे शांततापूर्ण मोर्चा काढतील. यावेळी E20 पेट्रोलच्या सक्तीविरोधातील स्वाक्षरी केलेल्या याचिका सादर केल्या जातील,” असे पक्षाने म्हटले आहे.

संविधान क्लबबाहेर केजरीवालांचा टाउन हॉल

E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी सोमवारीही केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात E20 धोरणाच्या अंमलबजावणीविरोधात त्यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाबाबत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून दिल्या जाणाऱ्या कथित परस्परविरोधी माहितीवर प्रश्न उपस्थित केला. E20 इंधनाच्या परिणामांबाबत सरकारने पुरेसा आणि ठोस अभ्यास केला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दिग्गजांना जिंकवणारा ‘चाणक्य’ आता स्वतः जिंकला; प्रशांत किशोर यांची प्रेरणादायी कहाणी

केजरीवाल यांच्या मते, E20 धोरणाच्या परिणामांबाबत सरकारकडून वेगवेगळी आकडेवारी आणि दावे केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून, या धोरणाची सक्तीने अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचे परिणाम स्पष्टपणे जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.

‘E20 मुळे वाहनांचे नुकसान आणि मायलेज कमी’

E20 धोरणावर टीका करताना केजरीवाल यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा दावा केला. तसेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचेही त्यांनी म्हटले. “एका बाजूला ते E20 चांगले असल्याचे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला ते E20 वाईट असल्याचे सांगतात. एका मंत्रालयानुसार 2 ते 5 टक्क्यांचा फरक आहे, तर दुसरे मंत्रालय 4 टक्के फरक असल्याचे सांगते. त्यांनी कोणताही अभ्यास केलेला नाही; ते फक्त हे धोरण लोकांवर लादत आहेत,” असा आरोप केजरीवाल यांनी केला.

“पंकजा मुंडे भाजप सोडा, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा” काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून मोठी ऑफर!

वाहनांचे नुकसान आणि मायलेज कमी होण्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला. “सरकार हे धोरण जनतेवर का लादत आहे? यात सरकारचा काय स्वार्थ आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच E20 पेट्रोलबाबत आपला विरोध स्पष्ट करताना केजरीवाल यांनी हे इंधन वाहनधारकांच्या हिताचे नसल्याचेही म्हटले.

‘ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय द्या’

AAPचे नेते सौरभ भारद्वाज यांनीही E20 धोरणाला विरोध केला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असला, तरी ग्राहकांवर एकाच प्रकारचे इंधन स्वीकारण्याची सक्ती करू नये, अशी पक्षाची भूमिका आहे. ग्राहकांना पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल आणि शुद्ध पेट्रोल, असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी AAP कडून करण्यात आली आहे. ग्राहकांना आपल्या वाहनाच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार इंधन निवडण्याचा अधिकार असावा, असा पक्षाचा दावा आहे.

केजरीवालांच्या केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या

E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

1. E20 आणि शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा :
देशातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 पेट्रोलसोबत शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचाही पर्याय मिळावा.

2. E20 पेट्रोल स्वस्त असावे :
जर E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण जास्त असेल आणि त्याचा वापर करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले जात असेल, तर त्याची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी.

3. पेट्रोलची किंमत 84 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी करावी :
सर्वसामान्य नागरिकांवरील इंधनाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी पेट्रोलची किंमत 84 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी असावी.

महत्वाची बातमी: गॅस कनेक्शन धारकांनी ‘या’ तारखेआधी LPG e-KYC करावी अन्यथा….

E20 धोरण नेमके काय आहे?

E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण आणि उर्वरित भाग पेट्रोल. इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर जैविक स्रोतांपासून तयार केले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे आयात केलेल्या कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व कमी करणे, इंधन आयात खर्चावर नियंत्रण ठेवणे तसेच देशांतर्गत उत्पादित इथेनॉलचा वापर वाढवणे, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.

मात्र, E20 इंधनाच्या वापराबाबत वाहनांची इंधन कार्यक्षमता, मायलेज, जुन्या वाहनांवरील परिणाम आणि ग्राहकांवर होणारा आर्थिक परिणाम यावरून राजकीय आणि सार्वजनिक पातळीवर चर्चा सुरू आहे.

E20 पेट्रोलवरून वाद तीव्र; नीती आयोगाच्या 2021 च्या अहवालाचा दाखला देत काँग्रेसचे सरकारला सवाल

सरकारची भूमिका काय?

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी E20 संदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम घाईघाईने किंवा कोणत्याही अभ्यासाशिवाय लागू करण्यात आलेला नाही. हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने, वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि विविध भागधारकांशी सल्लामसलत करून राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रक्रियेत नीती आयोग, वाहन उत्पादक कंपन्या, ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs), ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP) तसेच इतर तांत्रिक संस्थांचा सहभाग असल्याचे सुरेश गोपी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे E20 धोरणाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक आधारावर सरकारकडून भर दिला जात आहे, तर AAPकडून ग्राहकांचा पर्याय, वाहनांचे मायलेज आणि इंधनाच्या किमतीचा मुद्दा पुढे केला जात आहे.

E20 वरून सरकार विरुद्ध AAP संघर्ष तीव्र

E20 पेट्रोलचा मुद्दा आता केवळ इंधन धोरणापुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्षाचा विषय बनला आहे. केजरीवाल यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने AAPने केंद्र सरकारविरोधातील आंदोलन अधिक आक्रमक केले आहे.

आजचा मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने काढण्यात येणार असून, नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या याचिका पंतप्रधानांकडे सादर करण्याचा AAPचा प्रयत्न आहे. तसेच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते आणि केंद्र सरकारकडून AAPच्या मागण्यांवर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

700 रुपये उसने घेऊन भरला पीक विमा… परत मिळाले फक्त 211 रुपये, अपंग शेतकऱ्याची व्यथा

Exit mobile version