‘शाळेत गुरु नाहीत, मग देश विश्वगुरू कसा होणार?’; कन्हैया कुमारांचा मोदी सरकारला सवाल

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Untitled Design (96)

Untitled Design (96)

Kanhaiya Kumar’s question to the Modi government : देशभरात शिक्षण, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उद्याच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षण हा आमचा अधिकार आहे, असे ठामपणे सांगत देशभरातील 800 शहरांमध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील कथित अनागोंदी, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, शाळा बंद होण्याचे वाढते प्रमाण, बेरोजगारी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.

कन्हैया कुमार म्हणाले की, देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी दिलेला लढा आजही देशासाठी प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जात असताना त्यांच्यावर शेणफेक करण्यात आली, त्यांना अपमानित करण्यात आले, शाळा बंद करण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यांनी संघर्षाची वाट सोडली नाही. आजही शिक्षण क्षेत्रात त्याच मानसिकतेचे प्रतिबिंब दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेवर दबाव आणण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी उद्या पुण्यात येऊन सावित्रीबाई फुले यांच्या वारशाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षण हा आमचा अधिकार आहे हा संदेश पुण्यातून संपूर्ण देशाला दिला जाईल, असे कन्हैया कुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

तुम्ही पालकमंत्री झालात की मुख्यमंत्री…, नाशिक कुंभमेळ्याच्या 35 हजार कोटींच्या निधीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार

सध्याच्या भाजप सरकारवर निशाणा साधताना कन्हैया कुमार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाणीव नाही. कारण त्यांची स्वतःची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशातील सरकारी शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांना समजत नाहीत. शिक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील परीक्षा व्यवस्थेवर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर दावा केला. गेल्या दहा वर्षांत तब्बल 152 वेळा विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांचे पेपर फुटल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातही सातत्याने पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून परीक्षा देतात, मात्र काही भ्रष्ट यंत्रणा आणि निष्क्रिय प्रशासनामुळे त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार होणाऱ्या पेपरफुटींमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडत चालल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात एनटीएच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पेपरफुटीच्या अनेक घटना घडूनही जबाबदारांवर कठोर कारवाई झालेली नाही. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा होते, पण परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मुलगा हवा म्हणून PSI पतीकडून पत्नीचा छळ; जबरदस्ती गर्भपात, जीवे मारण्याचा आरोप

यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील आणखी एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात दररोज सुमारे 25 शाळा बंद होत असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ शाळाच नव्हे तर अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही टाळे लागले आहे. शिक्षण संस्था बंद होत असताना नवीन पिढीला दर्जेदार शिक्षण कुठून मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिक्षण क्षेत्रातील ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले.

बेरोजगारीच्या प्रश्नावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडत आहेत, मात्र त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. एका वर्षात एक लाख विद्यार्थ्यांनाही समाधानकारक रोजगार मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही नोकरीची हमी नसल्याने तरुणांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रात गंभीर संकट निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, तुमच्याकडे पैसे असले तरी तुमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल याची खात्री देता येत नाही, असे सांगत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या असमानतेकडे लक्ष वेधले. शिक्षण हा श्रीमंतांचा विशेषाधिकार नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कन्हैया कुमार यांनी सरकारच्या विविध नियुक्त्यांवरही प्रश्न उपस्थित केले. देशातील सामान्य विद्यार्थ्यांना संधी मिळत नसताना सत्तेशी संबंधित व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर स्थान मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे गुणवत्तेपेक्षा सत्तेला महत्त्व दिले जात असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

देश विश्वगुरू बनवण्याच्या घोषणांवरही त्यांनी टीका केली. ज्या देशात शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, ज्या देशात शाळा बंद होत आहेत, ज्या देशातील विद्यार्थी पेपरफुटीमुळे त्रस्त आहेत, तो देश विश्वगुरू कसा होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळेत गुरुच नसतील तर विश्वगुरू होण्याची भाषा करणे हा केवळ दिखावा असल्याचे त्यांनी म्हटले.

विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

कन्हैया कुमार यांनी सांगितले की, छात्रों की गुंज ही केवळ राजकीय मोहीम नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांची चळवळ आहे. शिक्षणाचा अधिकार, पारदर्शक परीक्षा व्यवस्था, रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी यासाठी देशभरातील युवक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील 800 शहरांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षभूमीतून शिक्षणाच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला जाणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. शिक्षण, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती काँग्रेसने आखली असून, राहुल गांधींच्या दौऱ्याकडे आता राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version