मीनाक्षी शिंदे पुन्हा वादात; दीड कोटींच्या व्होल्वो कारवरून भ्रष्टाचाराचे आरोप, सामाजिक कार्यकर्ते अजय जयांची ACB कडे तक्रार

Meenakshi Shinde: कंत्राटदाराने मीनाक्षी शिंदेंना दीड कोटी रुपयांची व्होल्वो कार भेट दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला.

Meenakshi Shinde Volvo Car Gift Allegation

Meenakshi Shinde Volvo Car Gift Allegation

Meenakshi Shinde Volvo Car Gift Allegation:ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर (Pradip Purnekar) यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत असतानाच आता त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिकेच्या एका कंत्राटदाराने मीनाक्षी शिंदे यांना तब्बल दीड कोटी रुपये किमतीची व्होल्वो कार भेट दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जया (Ajay Jeya) यांनी केला आहे. या तक्रारीमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

यंदाचा उन्हाळा होणार अधिक कडक! मार्च 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता

अजय जया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी शिंदे ज्या व्होल्वो कारमधून प्रवास करतात, ती कार त्यांच्या नावावर नसून महापालिका कंत्राटदार प्रमोद कृष्णा पवार यांच्या नावावर आहे. या कारचा क्रमांक MH04MH008 असा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संबंधित गाडीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे जया यांनी सांगितले. मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले जाते, तेव्हाही त्या याच गाडीतून येत असल्याचा दावा त्यांनी केला.

प्रतिज्ञापत्रात तीन दुचाकींचाच उल्लेख, चारचाकीचा पत्ता नाही

अजय जया यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राचा दाखला देत आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावावर प्रतिज्ञापत्रात केवळ तीन दुचाकी वाहनांची नोंद आहे. कोणत्याही चारचाकी वाहनाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. असे असताना त्या वेगवेगळ्या चारचाकी वाहनांचा वापर कशाच्या आधारे करतात, असा सवाल जया यांनी उपस्थित केला.

‘मायक्रोसॉफ्ट पुन्हा सुरू झाल्याचा पश्चाताप झालाय; आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल

विशेष म्हणजे, संबंधित व्होल्वो कार कंत्राटदाराच्या नावावर असतानाही मीनाक्षी शिंदे तिचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही गाडी भेट म्हणून देण्यात आली असेल, तर तिचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात का करण्यात आला नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कंत्राटदाराकडून भेटवस्तू स्वीकारली असल्यास त्याची योग्य नोंद असणे आवश्यक होते, असे जया यांचे म्हणणे आहे.

कंत्राटदाराला 200 कोटींची कामे मिळाल्याचा दावा

या प्रकरणात अजय जया यांनी केवळ गाडीपुरते आरोप मर्यादित ठेवलेले नाहीत. प्रमोद कृष्णा पवार हे ठाणे महापालिकेचे कंत्राटदार असून, त्यांना आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयांची कामे मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेषतः मीनाक्षी शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ‘कंचन कन्स्ट्रक्शन’ या कंपनीच्या माध्यमातून अनेक कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना विविध प्रभागांना विशेष निधी देण्यात आला होता. या निधीतून पवार यांना मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळाली आणि या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप जया यांनी केला आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली दोन कोटी, दीड कोटी रुपयांची विविध कामे देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

‘हा भ्रष्टाचाराचा पहिला भाग’; अजय जया यांचा गंभीर आरोप

एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर अजय जया यांनी माध्यमांशी बोलताना मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा पहिला भाग समोर आणत असल्याचे सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार, या प्रकरणासंदर्भात कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत.

Jalgaon Bank Election: गिरीश महाजनांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा; रक्षा खडसेंसमोर मात्र तगडे आव्हान ?

मीनाक्षी शिंदे यांच्या मुलीने नवीन व्होल्वो गाडीचे शोरूममधील अभिनंदनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा दावाही जया यांनी केला. संबंधित व्हिडीओ आणि छायाचित्रे मीनाक्षी शिंदे यांच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे फोटो किंवा व्हिडीओ मॉर्फ केलेले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात सुमारे पाच कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली आहे. मात्र, कोट्यवधींची कामे मिळवणाऱ्या कंत्राटदाराच्या नावावर असलेल्या दीड कोटींच्या गाडीचा वापर त्या करत असल्याचा आरोप जया यांनी केला आहे. महापालिकेतील पदाचा किंवा यंत्रणेचा वापर करून कंत्राटदाराकडून आर्थिक लाभ घेतला गेला आहे का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अडीच वर्षांपूर्वी हरवली, कुटुंबीयांनीही आशा सोडली; मात्र Google आणि ChatGPT मुळे पुन्हा भेट झाली!

दरम्यान, या प्रकरणी अजय जया यांनी एसीबीकडे तक्रार दिली असून, संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांनी केलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. या आरोपांवर मीनाक्षी शिंदे यांची भूमिका समोर आल्यानंतरच प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होतील.

Exit mobile version