सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ; नेमकं कारण काय?

मुंबईच्या सायन रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरचा वसतीगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

News Photo   2026 10 11T153102.446

Doctor Suicide

Doctor Suicide : मुंबईतील सायन रुग्णालयाच्या निवासी  (Doctor) डॉक्टरच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असं मृत डॉक्टरचं नाव असून, शनिवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतीगृहातील खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. शिवचरण हे सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होते. त्यांनी ॲनस्थेशियाच्या औषधाचा ओव्हरडोस घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली असून, मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी शिवचरण रुग्णालयात कामावर आले नसल्याचं लक्षात आलं. ते पीजी वसतीगृहात राहत असल्याने त्यांच्या रुम पार्टनरला खोलीत जाऊन पाहण्यास सांगण्यात आलं. सहकारी खोलीत पोहोचला, तेव्हा शिवचरण दिसले नाहीत. त्यानंतर त्यांना फोन केला असता मोबाईलचा आवाज बाथरुममधून ऐकू आला. त्यामुळे संशय आल्याने सहकाऱ्याने इतरांना याची माहिती दिली. पुढे पोलिसांनी खोलीत जाऊन बाथरुमचा दरवाजा उघडला असता शिवचरण मृतावस्थेत आढळले.

अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद हास्यास्पद; एलन मस्क यांचा पुन्हा टोला

घटनास्थळी शिवचरण यांच्या हाताला आयव्ही सलाईन लावलेलं होतं, तर बाथरुममधील कमोडमध्ये ॲनस्थेशियाच्या औषधाच्या 2 बाटल्या आढळल्या. या परिस्थितीवरून त्यांनी औषध स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केलं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी संबंधित अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येईल. शवविच्छेदन सायन रुग्णालयात करायचं की अन्य ठिकाणी, याचा पर्याय नातेवाईकांना देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांनी शिवचरण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यांच्या मृत्यूमुळे रुग्णालयाने एक होतकरू भावी सर्जन गमावल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमागील कारण पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले. रुग्णालयाकडून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क ठेवला जातो, असं इंगळे यांनी नमूद केलं. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version