आज महानगर पालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. (Pune) त्यामध्ये युती आणि आघाडीचाही अनेक ठिकाणी मोठा घोळ आहे. अनेक उमेदवारांच्या पदरी निराशा आल्याने नाराजी नाट्य सुरू आहे. कुठे पोस्टर फाड, दगडफेक, रडारडी आणि नेत्यांवर घणाघाती आरोप असं आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी युतीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे.
पुण्यासह महाराष्ट्रात कुठंही महायुती तुटलेली नाही. पुण्यात भाजप आणि शिवसेनेने काही एबी फॉर्म दिले आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघार घ्यायला दोन तीन दिवस आहेत असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी पुण्यात आलो आहे, 90 टक्के जागा शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे असंही ते म्हणाले.
Election LIVE Update : शिंदेंच्या आदेशाने पुण्यात आलोय; युतीचा काडीमोड? सामंत काय म्हणाले?
आज उदय सामंत यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत जागा वाढवून मिळाल्या नाहीत, तर शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने शिवसेनेला केवळ १७ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेचे स्थानिक नेते किमान ३५ ते ५० जागांसाठी आग्रही आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या राजकारणात सर्वात धक्कादायक वळण म्हणजे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर हे नवे समीकरण आकारास आले आहे. १६५ जागांच्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा देण्यात आल्या आहेत. शिवसेनेने आपल्या कोट्यातील ६५ पैकी २१ जागा मनसेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
