Video : लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका; अजित पवारांनी एक वाक्यात विषय संपवला
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मी फक्त विकासाच्या मुद्यांवर बोलणार आहे, इतर आरोपांवर मी बोलणार नाही.
आज पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. (Pune) अनेक समस्या समोर आहेत, या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यावेळी आमचा संकल्प आहे की, सर्व समस्यांमधून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करणार आहोत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपांची प्रश्नांना बगल दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
लांडगे यांची टीका काय?
उपमुख्यमंत्री अजित पवारचं महाराष्ट्राचे आका आहेत. अशी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा. मुळात ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावं असे महेश लांडगे म्हणाले. मला पिंपरी चिंचवडचा ते आका म्हणतायेत, मुळात तेच महाराष्ट्राचा आका आहेत असा पलटवार करत एकेकाळचे वस्ताद असलेल्या अजित दादांना पैलवान महेश लांडगेंनी कुस्तीचं आव्हान दिलं आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थाने पूर्वीचे वस्ताद अजितदादा विरुद्ध पैलवान महेश दादा अशी लढाई पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात सुरु झाली आहे.
सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय, ते नैराश्यात आहेत, अशी घणाघाती टीका लांडगेंनी केली. पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, असा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर लांडगे ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत असे लांडगे म्हणाले. मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पाहा असेही लांडगे म्हणाले. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असा सवाल देखील लांडगेंनी केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
दरम्यान, महेश लांडगेंच्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कोण आहे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत कळ काढा उत्तर देतो असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून एक अलार्म पाच काम हे कॅंपेन सुरू होत आहे. पुण्यातील खड्डे, कचरा , गुन्हेगारी, पाणीटंचाई या मुद्द्यांवर रॅप सॉंगमधून भाजपच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. हे गाणं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कारभाराबद्दल आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराबाबत हे नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कचरा , वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते, पाणीटंचाई , गुन्हेगारी हे पुण्याचे अलार्म आहेत असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आपण जे गाणं तयार केलं आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरते मर्यादित आहे. केंद्र आणि राज्य सरकार याचा कुठेही संबंध नाही असे अजित पवार म्हणाले. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जाते त्याचा फटका नागरिकांना बसतो असेही अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे प्रचारात का येत नाहीत? अजित पवार म्हणाले…
सुप्रिया सुळे प्रचारात का येत नाहीत? असा सवाल देखील अजित पवार यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्याशी बोलणं झालं आहे ते प्रचाराला येणार आहेत. राज्यभर निवडणूक आहेत सगळे जिथं तिथ प्रचार करत आहेत. पुण्याची मेट्रो मनमोहन सिंग यांच्या काळात मंजूर झाल्याचे अजित पवार म्हणाले.
