Download App

प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ ठेवणे अन् खाणे धोकादायकच; ‘या’ आजारांना मिळते आमंत्रण..

Food In Plastic : आजच्या जमान्यात प्लास्टिक अत्यंत आवश्यक झाले आहे. कोणत्याही कामात आता प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. मार्केटमधून एखादी वस्तू आणायची असो किंवा खाद्य पदार्थाचे पार्सल असो.. प्रत्येक कामासाठी प्लॅस्टिकला पर्याय (Food in Plastic) राहिलेला नाही. अनेक जण इडली, ढोकळा या वाफेवर तयार होणारे अन्य खाद्य पदार्थासाठी सुद्धा प्लास्टिकचा वापर होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की ही साधी दिसणारी गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे. चला तर मग याचीच माहिती घेऊ या..

कर्नाटकात नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला. इडली तयार (Idli) करताना सुती कापडाऐवजी प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याचे फूड सेफ्टी विभागाच्या (Food Safty Department) तपासणीत आढळून आले. इडली तयार करताना प्लास्टिकचा वापर गंभीर आजाराचा धोका उत्पन्न करत असल्याचे दिसून आले. फूड सेफ्टी विभागाचा अहवाल आल्यानंतर नागरिकांतही खळबळ उडाली. प्लास्टिक खरेच आरोग्यासाठी इतके धोकादायक आहे का याबाबत चर्चा सुरू झाली. आता याबाबतीत तज्ज्ञांचे काय मत आहे हेही जाणून घेऊ..

इडली आवडीने खाताय? पण होऊ शकतो कॅन्सर; कर्नाटकात ‘इडली’ फेल, काय घडलं?

प्लास्टिकमध्ये खाताय मग सावध व्हा

अपोलो रुग्णालयाचे सिनियर कन्सल्टंट डॉ. संचयन रॉय सांगतात की प्लास्टिकच्या वस्तूत खाद्यपदार्थ ठेवले तर आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. प्लास्टिकमधील ‘बिस्फेनॉल ए’ आणि ‘फ्लेथलेट्स’ खाद्यपदार्थात मिसळून शरीराला अपायकारक ठरू शकतात. हे केमिकल शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवू शकतात. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढू शकतो. यामध्ये कॅन्सर, मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड तसेच प्रजननाशी संबंधित समस्या बळावण्याची शक्यता असते.

प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास पोषक तत्वांची कमतरता जाणवते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ ठेवले असतील तर या खाद्यपदार्थांबरोबर मायक्रो प्लास्टिक शरीरात प्रवेश करते. यामुळे पाचन तंत्रात बिघाड होण्याचा धोका असतो. शरीरात ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील वाढतो. यामुळे पेशींना नुकसान होते. या गोष्टींचा विचार करून खाद्यपदार्थ ग्लास, स्टील किंवा अन्य सुरक्षित धातूंच्या भांड्यात ठेवा.

कॅन्सरचा धोका आहेच

राजीव गांधी कॅन्सर रूग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विनीत तलवार सांगतात की प्लास्टिक गरम झाल्यानंतर त्यातून बिस्फेनॉल ए आणि फ्लेथलेट्ससारखे घातक रसायने निघतात. हे केमिकल खाद्यपदार्थात मिसळून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करतात. दीर्घ काळ प्लास्टिकमध्ये ठेवलेले किंवा तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

पाचन तंत्रावर हल्ला

जर प्लास्टिकचे लहान कण खाद्यपदार्थात मिसळले गेले तर यामुळे शरीरातील पाचन तंत्र खराब होण्याची दाट शक्यता असते. यामुळे गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होतात. तेव्हा प्लास्टिकला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखा ही गोष्ट नक्कीच तुमच्या हातात आहे.

अरे बापरे! दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू, WHO चा धक्कादायक अहवाल

प्लास्टिकमधील केमिकल लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे. प्लास्टिकचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे हार्मोनल असंतुलन आणि डेव्हलपमेंट संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

प्लास्टिकचा वापर टाळा

बरेचसे लोक इडली तयार करताना इडली स्टँडमध्ये पॉलिथीन लावून इडली तयार करतात. इडली स्टँडला चिटकू नये यासाठी आयडिया वापरली जाते. पण उष्णतेने प्लास्टिक वितळून धोकादायक रसायने इडलीत मिसळण्याची शक्यता असते. हेच केमिकल नंतर शरीरात प्रवेश करतात जमा होऊ लागतात आणि गंभीर समस्या निर्माण करू शकतात. तेव्हा आताच सावध व्हा प्लास्टिकचा मोह टाळा प्लास्टिकमुळे काय नुकसान होऊ शकते याची माहिती घ्या आणि प्लास्टिकचा वापर कमी करत चला.

follow us