इडली आवडीने खाताय? पण होऊ शकतो कॅन्सर; कर्नाटकात ‘इडली’ फेल, काय घडलं?

Karnataka News : सावधान जर तुम्ही बंगळुरूमध्ये राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. फूड सेफ्टी विभागाच्या (Food Safty Department) तपासणीत इडलीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. इडली खाल्ल्याने कॅन्सरसारखा घातक (Cancer) आजार होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. खाद्य विभागाच्या माहितीनुसार बंगळुरूच्या अनेक भागात इडली तयार करण्यासाठी सुती कापडाऐवजी प्लास्टिक शीटचा वापर केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात हानिकारक केमिकल आणि सिंथेटिक रंगांचा वापर केला गेला होता. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो.
खरंतर आज प्लास्टिक मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी प्लास्टिकला हद्दपार करू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. प्लास्टिक आरोग्याला धोकादायक आहे यात काहीच शंका नाही. इडली तयार करण्यासाठी आधी सुती कापडाचाच वापर केला जात होता. पण आता या कापडाची जागा प्लास्टिकने घेतली आहे.
इडली आधी कागदात पॅक करून दिली जात होती. पण आता प्लास्टिकच्या पिशवीत दिली जाते. प्लास्टिकमध्ये कोणताही गरम पदार्थ टाकला तर प्लास्टिक लगेच केमिकल सोडू लागते. या गोष्टीची माहिती नसल्याने लोक हे पदार्थ प्लॅस्टिकमधून काढून खातात. यामुळे कॅन्सरशी संबंधित अनेक गंभीर आजार होण्याचा धोका आहे. याबाबतीत तज्ज्ञ काय म्हणतात हेही जाणून घेऊ या..
सावधान! आताच ‘ही’ सवय बदला नाहीतर बहिरे होताल; आरोग्य मंत्रालयाचा इशारा, राज्यांना धाडले पत्र
काही हॉटेल आणि विक्रेत्यांकडून इडली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा तांदूळ आणि उडीद डाळ खराब दर्जाची वापरली जात असल्याचे या तपासणीत दिसून आले. इडली जास्त पांढरी आणि आकर्षक दिसावी यासाठी त्यात ब्लिचिंग पावडर, सिंथेटिक कलर आणि केमिकल मिसळले जात असल्याचेही या तपासणीत दिसून आले. हे नुकसानदायक घटक शरीरात गेल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.
फूड सेफ्टी विभागाने बंगळुरूत अनेक ठिकाणी छापेमारी केली. या दरम्यान 500 पेक्षा जास्त नमुने गोळा करण्यात आले. यातील 35 पेक्षा जास्त नमुने ठरवून दिलेल्या मानकांची पूर्तता करू शकले नाहीत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्या खाद्य पदार्थात नियमितपणे केमिकलचे सेवन केले जात असेल तर दीर्घकाळात कॅन्सर सारख्या आजाराचे कारण ठरू शकते. दिल्ली कॅन्सर रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागातील डॉ. रजत जैन यांनी सांगितले की प्लास्टिकमध्ये तयार होणाऱ्या इडलीमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. कारण प्लास्टिकमध्ये काही रसायने असतात.
उदा. जर यात बिस्फेनॉल ए आहे तर यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अशाच पद्धतीने जर प्लास्टिकमध्ये जर फ्लॅथलेट्स असतील तरी सुद्धा आरोग्यासाठी धोकादायक आहे. या केमिकल्सना कार्सीजेनिक मानले गेले आहे. या रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. ज्यावेळी प्लास्टिकमध्ये इडली ठेवली गेली असेल त्यावेळी हा धोका अधिक वाढतो.
अरे बापरे! दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू, WHO चा धक्कादायक अहवाल
पॉलिथीन शीटवर बंदी
दरम्यान, कर्नाटक सरकारनेही (Karnataka News) या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने सर्व हॉटेल आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य दुकानांत इडली बनवण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी याबाबत घोषणा केली. पॉलिथीन शीटचा वापर केल्याने इडली नमुन्यात कॅन्सरकारी घटक आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक खाद्य सुरक्षा विभागाने सांगितले की 52 हॉटेल इडली बनवताना पॉलीथीन शीटचा वापर करत असल्याचे दिसून आले होते. विभागाने जवळपास 251 ठिकाणांवरून इडली नमुने गोळा केले होते.