Bala Nandgaonkar On BJP : देशाचे पुन्हा एकदा खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी करावे या भावनेतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केला.
दरम्यान, शिर्डी मध्ये माझ्या नावाची चर्चा असली तरी मी आमच्या पक्ष चिन्हावर येथे लढू शकत नव्हतो. त्यामुळे उमेदवार म्हणून उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरणही नांदगावकर यांनी दिले.
मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी शनिवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ तसेच देविदास खेडकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याआधी नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाजप व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा या देशाचे खंबीर नेतृत्व करावे या भावनेतून हा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नगर व शिर्डीतील पदाधिकाऱ्यांची नगरला बैठक घेतली आहे.
नगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील व शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी ताकदीने मैदानात उतरावे, रात्रीचा दिवस करून हे दोन्ही उमेदवार आपले आहेत असा घराघरात प्रचार करावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे व त्यादृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केला आहे, असे नांदगावकर म्हणाले.
चिन्ह नसल्याने प्रश्नच नव्हता
शिर्डी मतदार संघातून माझ्या नावाची चर्चा होती. शिर्डी व नगरमधील अनेक कार्यकर्ते नाशिकला मला येऊन भेटले होते. शिर्डीमधून मी उमेदवारी करावी अशी त्यांची पक्षाकडे मागणी होती. शिर्डीमध्ये मी बरेच वर्षे काम केले आहे. माझा स्वभाव व मी राजकारणा पलीकडे जाऊन जपलेले संबंध यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पक्षामध्येही याबाबत चर्चा झाली पण मला आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती.
उमेदवारी अर्ज दाखल करताना विखे दाखवणार ताकद, शिंदे- फडणवीसांसह अजित दादांची हजेरी
मात्र, शिर्डीमध्ये पक्ष चिन्हावर मी निवडणूक लढू शकत नव्हतो. त्यामुळे मी येथे उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आता महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत, त्यांचा प्रचार प्रामाणिकपणे करण्यावर आम्ही भर देणार आहोत, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले.