Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश करेल हे देखील कोणालाच सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला (Congress) मोठा धक्का देत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर आता पुन्हा एकदा काँग्रेसला राज्यात मोठा धक्का लागणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.
लवकरच सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र तो नेता कोण आहे याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळख आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
कराड येथे बोलताना सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. यानंतर राजकीय वर्तुळात तो नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे. जर प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा खरा ठरला तर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येऊ शकते.
पृथ्वीराज चव्हाण यांची सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळख असल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यावर ते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेस हायकमांडचा देखील त्यांच्यावर विश्वास आहे. पक्षातील काही महत्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांचं नाव येतो. यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.