Shahjibapu Patil : काय झाडी काय डोंगर म्हणणारे शहाजी बापू आज राज्यभरात फेमस आहेत. त्यांच्या सभेतील फटकेबाजीला मोठी दाद मिळते. माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये शहाजी पाटलांनी आपल्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. या औलादींनी चाळीस वर्ष शहाजीबापू पाटलाला घरात बसवलं. (Shahjibapu Patil) माझ्या बायकोला फाटक्या लुगड्यात ठेवलं अशा शब्दांत पाटलांनी माढ्याच्या मोहिते पाटील घराण्यावर जोरदार हल्ला केला. तसंच, आता हे मैदानात सापडलेत यांना सोडायचं नाही असंही पाटील यावेळी म्हणाले.
तर माझ्या बापाचं नाव सांगणार नाही
शहाजीबापू पाटलांनी यावेळी मोहिते पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. उजनी, टेंभू, म्हैसाळ यातून सांगोला तालुक्याला पाणी दिलं नाही असं म्हणत मोहिते पाटलांनी सांगोला तालुका वाळवंट केला, पूर्ण तालुका उध्वस्त केला अशा शब्दांत मोहिते पाटलांवर घाणाघात केला. तसंच, दोन वर्षात तालुक्यातील सर्व भागात पाणी दिलं नाही तर माझ्या बापाचं म्हणजे राजाराम पाटलांच नाव लावणार नाही असा विश्वासही पाटलांनी यावेळी उपस्थितांना दिला.
पाटलांना एका दणक्यात पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले
यावेळी बोलताना शहाजीबापू म्हणाले, माझ्या सख्ख्या भावाचं निधन झालं तेव्हा मी शरद पवारांसोबत 8 सभा घेतल्या. या पद्धतीने मी शरद पवारांसोबत प्रामणिक होतो. मात्र, शरद पवार मला म्हणायचे बापू तुम्ही यावेळी निवडणून येतात आणि माझ्या पाठीमागे वेगळं बोलायचे असा थेट आरोपच त्यांनी यावेळी शरद पवारांवर केला. तसंच, पुलोद सरकारची आठवण काढत त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले आम्ही गुहाटीला गेलो. आमचं युतीच सरकार आलं. परंतु, सर्वांनी आमच्यावर गद्दार म्हणत टीका केली. मात्र, वसंतदादा पाटलांना एका दणक्यात पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले ही गद्दारी नाहीका असा पलटवार यावेळी शहाजी बापूंनी केला.
तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळाला
माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो की, मी निवडणुका लढवल्या त्या गणपतरावांना पाढण्यासाठी नाही तर माझ्या जनतेला पाणी मिळावे यासाठी निवडणूक लढवत होतो असंही शहाजी बापू पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच, सांगोला तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळाला तो कशामुळे मिळाल तर महायुती सरकारमुळे असंही शहाजी बापू यावेळी म्हणाले.