सांगली लोकसभा मतदारसंघात चाचपणीसाठी, आढावा घेण्यासाठी, गाठीभेटी आणि संवादासाठी आलो आहे. पुण्या-मुंबईतील पथक घेऊन आलोय… असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगली दौऱ्याची सुरुवात झाली. पण दौरा संपला तेव्हा राऊतांनी या गोष्टी सोडून बाकी सगळे साधले. म्हणजे सांगलीत (Sangli) येऊन वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांनी वाद ओढावून घेतला, जिल्ह्यातील काँग्रेसच्या (Congress) नेत्यांबद्दल विविध दावे करुन त्यांना नाराज केले. आजी-माजी आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या पण एकाचाही पाठिंबा मिळविण्यात ते सपशेल अपयशी ठरले. थोडक्यात ज्या उद्देशाने राऊत सांगलीत आले होते, तो उद्देशच राऊतांना साधता आलेला नाही. त्यामुळे सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांची वाट सोपी झाली आहे का? (Thackeray group MP Sanjay Raut’s failed Sangli tour will be beneficial for Vishal Patil)
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सांगलीच्या जागेबाबत इरेला पेटले आहेत. ठाकरेंनी दिल्लीतच सांगितले की आमच्यासाठी जागावाटप संपले आहे. आता 2029 मध्ये पाहू. पण काँग्रेसच्या नेत्यांनी काही मॅच सोडली नाही. विशाल पाटील, विश्वजित कदम हे दिल्ली, मुंबई, नागपूर जिथे जशी जमेल तशी बॅटिंग करतच राहिले. हे पाहून संजय राऊतांनी सांगलीचा दौरा आखला. पण इतर शहरांच्या तुलनेत आडवळणी असलेल्या सांगलीसारख्या शहरात राऊतांनी तीन दिवस तळ ठोकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सांगलीसाठी ठाकरे गट एवढा आग्रही का? ते देखील सात दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उमेदवारासाठी एवढा आटापीटा का? असे अनेक प्रश्न पडू लागले. त्यामुळेच या दौऱ्यातून राऊत काय साधतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
राऊत सांगलीमध्ये आले. त्यांना या दौऱ्यात सर्व महाविकास आघाडी एकत्र आहे, असे दाखवायचे होते. पण त्यांना ते साधता आले नाही. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड वगळता एकही विद्यमान आमदाराने राऊतांना भेट दिली नाही. सांगलीत शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची ताकद राऊतांना चंद्रहार पाटील यांच्यामागे उभी करायची होती. त्यासाठी ते तासगावमध्ये आर. आर. पाटील यांच्या स्मृतीस्थळी गेले. कडेगावला सोनहिरा कारखान्याजवळ पतंगराव कदम यांच्या समधीस्थळी गेले. तिथे काही स्थानिक कार्यकर्ते सोडता राऊतांना कोणीच भेटले नाही. विश्वजीत कदम, विक्रम सावंत, सुमन पाटील अशा आमदारांची आणि राऊतांची भेट झालीच नाही.
विलासराव जगताप, अजितराव घोरपडे अशा माजी आमदारांना राऊतांनी चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण हे नेतेही राऊतांच्या गळाला लागले नाहीत. घोरपडे यांनी राऊतांना टिपिकल राजकीय उत्तर दिले. “तुमचं काय ठरल्याशिवाय आम्ही कसं काय सांगायचं? आजपर्यंत अपक्ष म्हणून निवडून आलोय. कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन, त्यांचे विचार घेऊन आम्हाला ‘डिक्लेर करावे लागेल. असे एकतर्फी करता येणार नाही” असे म्हणत घोरपडेंनी राऊतांचा विषय संपवला. त्याचवेळी “चंद्रहार पाटील हा सक्षम उमेदवार नव्हे. तो नवखा आहे. तुमच्या पक्षाचे नेटवर्क खूप कमी आहे. दहा तालुके, सहा विधानसभा मतदारसंघात यंत्रणा राबविणे तुमच्यासाठी सोपी गोष्ट नाही. दोन हजार दोनशे बुथ आहेत. त्यामुळे विशाल हा शंभर टक्क्के पर्याय होऊ शकतो. त्याच्याच नावाचा विचार करायला हरकत नाही. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शिवसेनेला, बाळासाहेबांना ताकद दिली. त्याच दादा घराण्यातील उमेदवाराला, दादांच्या नातवाला तुम्ही कॉर्नर करत आहात. यासारख्या सर्वच गोष्टींचा जरा विचार करा” असे खडे बोल विलास जगताप यांनी राऊतांना सुनावले.
राऊतांना जसा आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही, तसाच कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी तर या दौऱ्यापासून लांबच होते. ते सहाजिकही होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आपल्यासोबत आहे, असे सांगणाऱ्या राऊत यांच्याकडे पवार गटातील कोणीही फिरकले नाही. सांगली शहरात आणि तासगावमध्ये पवार गटाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राऊतांचे पाहुणे म्हणून स्वागत केले. पण महायुती म्हणून राऊतांना पाठिंबा मिळवता आला नाही. त्यातूनच उद्वि्ग्न होत राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली. सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल, तर त्यांची राज्यभरात कोंडी होईल हे लक्षात ठेवावे असा इशारा दिला. काँग्रेसच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी महाविकास आघाडीच्या परिवर्तनामध्ये सामील व्हावे; अन्यथा जनता माफ करणार नाही. असा इशारा दिला.
काँग्रेस आणि पवार गटाकडून मिळणारा नकारात्मक प्रतिसाद पाहून राऊतांचा संयम सुटला. त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाऊन काँग्रेसलाच अंगावर घ्यायला सुरुवात केली. वसंतदादा पाटील यांची सहकार सम्राट असा उल्लेख केला. विशाल यांचे पायलट असलेल्या कदमांचे विमान गुजरातकडे भरकटणार नाही, याची काळजी घेऊ असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली. रातोरात निषेध पत्रक काढण्यात आले. त्यानंतरही राऊत थांबण्याचे नाव घेत नव्हते. सांगलीतील इस्लामपूर असो अगर कडेगाव, पलूस इथल्या नेत्यांनी त्या त्या ठिकाणी आपले संस्थान उभारले आहे. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था वाचवण्यासाठी, स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भाजपसोबत हातमिळवणी करत आहेत. त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काही नेत्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत, अशी विधाने केली. त्यामुळे राऊतांना महाविकास आघाडी म्हणून सांगलीतून पाठिंबा मिळविण्यात सपशेल अपयश आले.
राऊतांच्या सांगली दौरा फेल जाण्याचे कारण ठरले पवारांचे विधान. सांगलीची उमेदवारी मित्रपक्षांना विश्वासात न घेता जाहीर झाली आहे, असे शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वाक्यामुळे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, असा संजय राऊतांचा दावा फोल ठरला. काँग्रेसचा पाठिंबा नाही, पवारांचा पाठिंबा नाही, मग चंद्रहार पाटील केवळ ठाकरेंचे उमेदवार ठरले. याबद्दल त्यांना विचारल्यावर त्यांनी थेट बोलणे टाळले. पण भिवंडीची उमेदवारीही एकमताने झालेली नाही, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत, असे म्हणत पवारांना डिवचले. अखेरीस जाता जाता राऊतांनी “ते बरोबर असोत वा नसोत, आम्ही एकटे लढू” असे म्हणून काँग्रेस आणि पवार गटाच्या नेत्यांना फटकारले. पण राऊतांना या मिळालेल्या सगळ्याच नकारात्मक प्रतिसादाने विशाल पाटील यांची वाट सोपी झाली आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.