Download App

फडणवीसांची मदत, केंद्रीय मंत्र्यांची मध्यस्थी अन् काठमांडूत डांबून ठेवलेल्या 58 पर्यटकांची सुटका

पुणे : पर्यटनासाठी नेपाळला (Nepal) गेलेले आणि राजधानी काठमांडूत डांबून ठेवलेले नवी मुंबईतील 58 पर्यटक सुखरुप घरी परतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीने या सर्वांची सुखरुप सुटका झाली आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे या सर्वांना तिथे डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. (58 tourists from Navi Mumbai who went to Nepal for tourism and were stranded in the capital Kathmandu returned home safely.)

याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबई येथील कामोठेमधील 35 महिला आणि 23 पुरुष 16 डिसेंबर रोजी नेपाळसह उत्तर भारतात पर्यटनासाठी गेले होते. उत्तर प्रदेशातील काही ठिकाणे फिरुन 23 डिसेंबर रोजी सर्व जण काठमांडूमध्ये पोहचले. मात्र तिथे गेल्यानंतर काठमांडूतील राधाकृष्ण टूर्स ट्रॅव्हल्सने पर्यटकांच्या यात्रा ट्रॅव्हल्स एजन्सीकडून पैसे मिळाले नसल्याचा दावा केला. तसेच आता हे सहा लाख तुम्ही द्या, अन्यथा आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, अशी दमदाटी करण्यास सुरुवात केली.

‘गुजरातला जाणारे प्रकल्प रोखण्याची हिंमत राणेंमध्ये नाही’; ‘पाणबुडी’ प्रकल्पात राऊतांची ठिणगी

यावर सर्व पर्यटकांनी “आम्ही सर्व पैसे भरलेले आहेत, तुम्ही दोन्ही टॅव्हल्स एजन्सी तुमचा व्यवहार पाहून घ्या” असे सांगून सोडण्याची विनवणी करु लागले. पण हॉटेल व्यवस्थापन आणि राधाकृष्ण टूर ट्रॅव्हल्स व्यवस्थापन ऐकायला तयार नव्हते. यानंतर पर्यटक संजय म्हात्रे यांनी मुंबईतील मित्राला फोनवरून संपर्क साधून मदत मागितली. त्यावेळी मुंबईतील मित्राने त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन दिला. म्हात्रेंनी फडणवीस यांना मेसेज पाठवून घडलेला प्रकार सांगितला.

आपला विजय होईल असे समजून… : 2024 ची भीती सांगत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

यानंतर मुंबई आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी सुत्रे फिरली. फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधला. सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका झाली. गोरखपुरमध्ये पोहचल्यानंतर प्रयागराजचे जिल्हाधिकारी पर्यटकांना भेटले. तिथून मुंबईत येण्यासाठी फडणवीस यांनी रेल्वेचीही सोय करुन दिली. फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मदत मागितली. यानंतर या पर्यटकांसाठी विशेष बोगी जोडून मुंबईला आणण्यात आले. अखेर 28 तारखेला सर्व पर्यटक सुखरुप घरी परतले.

follow us

वेब स्टोरीज