‘गुजरातला जाणारे प्रकल्प रोखण्याची हिंमत राणेंमध्ये नाही’; ‘पाणबुडी’ प्रकल्पात राऊतांची ठिणगी
Sanjay Raut : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून पहिली ठिणगी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टाकली आहे. टेस्ला, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, हिरे बाजार असे 17 प्रकल्प या सरकारच्या काळात गुजरातला गेले. हे प्रकल्प जबरदस्तीने खेचून नेले. याला दरोडेखोरी म्हणतात, अशा शब्दांत राऊत यांनी घणाघाती टीका केली. राऊत यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा हल्लाबोल
महाराष्ट्रामधून १७ प्रकल्प बाहेर गेले असे असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे आकडे देतात. दोघेही आता तोंड शिवून गप्प बसले आहेत. दहशतीखाली उद्योगपती यांना घेऊन चालले आहेत. मुंबईची वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत. नरेंद्र मोदी म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्याही पंतप्रधानांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. नारायण राणे यांच्यात इतकी ताकद नाही की ते उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलतील.
सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्याची हिंमत नारायण राणे यांच्यात नाही. मी शिवसेनेत 25 वर्ष होतो असे ते म्हणतात ना. मग त्यांनी एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, असे ठणकावून सांगावे. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये होते ना मग आता त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता मग सांगा ना की राज्यातून एक ही प्रकल्प बंद होऊ देणार नाही म्हणून अशा शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले.
राम मंदिराचा सोहळा भाजपने राजकीय केला
राम मंदिर सोहळा आनंदाचा क्षण आहे. खरंतर हा देशाचा सोहळा पाहिजे पण आता भाजपाचा सोहळा झाला आहे. भाजपने राम मंदिर सोहळा राजकीय केला. अक्षदा वाटत आहेत की जणू एक लग्नसोहळा आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने बलिदान दिले त्याला आम्हाला कुठलेही गालबोट लावायचे नाही पण आम्ही योग्य वेळी नक्कीच बोलणार आहोत, असे राऊत म्हणाले.