सोशल मीडियावर स्टोरी ठेवल्याचा राग अनावर; दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. त्यामद्ये मोठा वाद झाला.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 17T152431.363

सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी टाकण्याच्या किरकोळ (Beed) कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे घडली आहे. येथे काल रात्री उशीरा तरुणांच्या दोन गटात धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

काय घडलं?

आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांच्या विरोधात टाकलेल्या ‘स्टोरी’वरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कुरापत काढली जात होती. याच वादाचं पर्यावसान सोमवारी रात्री हाणामारीत झालं. एका गटातील तरुणांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर सपासप वार केले.

आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात वाळू माफियांचा धुमाकूळ, जप्त केलेला टेम्पो पळवला

या भीषण हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०, रा. रुईनालकोल) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुणही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर (अहमदनगर) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

​पोलीस प्रशासनाची धाव

घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात सध्या तणावाचं वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

follow us