पुण्यात भाजप-राष्ट्रवादीमध्येच संघर्ष; ‘दादा’भारी पडणार की अण्णा ?
pune municipal corporation election 2026-पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये जोरदार संघर्ष दिसतोय.
Murlidhar Mohol VS Ajit Pawar : पालकमंत्री म्हणतात शहरातील कोयता गँग, गुन्हेगारी संपली पाहिजे. त्याच वेळी पुण्याच्या चारही दिशांना त्यांनी दिलेल्या उमेदवारांची यादी पाहिली, तर ती कोणत्या तत्त्वात बसते, हे त्यांनीच सांगावं, असा थेट हल्ला पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) केलाय. पुण्याचे पालकमंत्री अजितदादांनी मागचा पुढचा विचार न करता मोहोळांना थेट उत्तर दिलं. कुख्यात गुंडाला परदेशात पळवून कुणी लावलं? असा सवाल अजित पवारांनी (Ajit Pawar) विचारला. त्यानंतर काहीच वेळात भाजपची सत्ता राहिलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. दुसऱ्या दिवशी शनिवारी पुण्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी अजितदादांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहायला हवं. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही कधी आरोप करायला गेलो, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, असा इशारा रविंद्र चव्हाणांनी दिलाय. यावरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमधील पुण्यातील वाद किती टेकाला गेलाय, हे दिसतंय. पुण्याचा दादा कोण यासाठी हा राजकीय संघर्ष कसा हे थेडं इतिहासात जावून पाहुया…
भाजपची महापालिकेत सत्ता पण अजितदादांमुळे बॅकफूटवर
पुण्याच्या राजकारणातील सध्याचे दादा म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीने 2007 ते 2017 या कालावधीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. 2017 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपाला 97 जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. पुणेसारखं मोठं शहर भाजपने ताब्यात घेतलं, त्यावर पुढचं गणित अवलंबून होतं. पण राज्यात व केंद्रात सत्ता असूनही भाजपाला पुण्यात मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवता आलं नाही. त्याचे कारण अजितदादा पवार हेच होते. कारण 2019 ते 2022 या काळात काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. तर पुण्याचे पालकमंत्रीही तेच होते. त्यावेळी महापौर होते मुरलीधर मोहोळ. त्यामुळे महापौरपद मिळूनही भाजपाला पुण्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व गाजवता आले नाही. त्यानंतर अजितदादा महायुतीमध्ये आले, पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि पालकमंत्रीही. अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या. त्यामुळे अजितदादांचे पुण्यात वर्चस्वच दिसून आले.
मोहोळ खासदार झाले आणि मोठी जबाबदारी आली
पुढे लोकसभा निवडणुकीत महापौर मुरलीधर मोहोळ हेच खासदार झाले. पुण्यावर आपलं वर्चस्व राहावे म्हणून पहिल्यांदा लोकसभेत आलेले मोहोळ थेट मंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. गृह व सहकार खात्याचा कारभार असलेल्या अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ यांना सहकार खात्याच्या राज्यमंत्र्याची जबाबदारी मिळालीच. शिवाय नागरी उड्डाण खात्याचे ते राज्यमंत्री झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भरभक्कम पाठिंब्यामुळे मोहोळ यांच्याकडे पुणे शहर भाजपाचे नेतृत्व आले.
आम्हाला संधी द्या.., तुमचा कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांचं सांगलिकरांना आश्वासन
सहकारात आणि ग्रामीण भागात अजितदादांचा दबदबा
मोहोळ यांच्या माध्यमातून पुणे शहरासह जिल्ह्यात पवारांना शह देण्याचे मनसुबे भाजप नेतृत्वाने रचले. परंतु मंत्रिपद व पक्ष संघटनेतील मानाचे स्थान मिळूनही मोहोळांना दादांना शह देता आला नाही. मोहळांनी दादांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. ज्या सहकार क्षेत्राचे ते मंत्री आहे त्या सहकारातही ते दादांचे पानही हलवू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. सहकारात दादांचाच दबदबा राहिला. तसेच पुणे जिल्ह्यातही काँग्रेससह इतर पक्षातील बलाढ्य नेत्यांना पक्षात घेऊनही दादांच्या वर्चस्वाला हादरा देण्यात मोहोळांना अर्थात भाजपला यश आले नाही.
Lakshman Hake : ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय केलं? लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
क्रीडा क्षेत्रात अजितदादांशी संघर्ष पण…
अजित पवारांना शह देण्यासाठी मोहोळ यांनी क्रीडा क्षेत्रातही प्रवेश केला. महाराष्ट्र केसरी कुस्तीसह विविध स्पर्धांचे आयोजन करत क्रीडा क्षेत्रात बस्तान बसविले. त्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणूकीत मोहोळ यांनी अजितदादांच्या विरोधात शड्डू ठोकला. अजितदादांशी जवळीक असलेल्या संघटनेच्या सरचिटणीसावर आरोप करत जबरदस्त वातावरण निर्माण केले. मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी थेट दादांनाच आव्हान दिल्याने एरव्ही कधी चर्चत नसलेली निवडणूक अचानक राज्यव्यापी झाली. अखेरीस थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हस्तक्षेप केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. परंतु, दादा अध्यक्ष झाले तर उपाध्यक्षपदावर मोहोळांना समाधान मानावे लागले. मोहोळ व दादा यांच्यातील दुसरा डावही अखेरीस दादांनीच जिंकला.
नगरपालिकाही अजितदादांनी राखल्या !
दादा व मोहोळ यांच्यातील कुरघोडीचा तिसरा अंक नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत झाला. या निवडणुकीत मोहोळ यांच्याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु निवडणुकीत अजितदादांचीच सरशी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील 10 नगरपालिकांवर सत्ता मिळविली. याद्वारे दादा हेच जिल्ह्याचे कारभारी असल्याचे अधोरेखित झाले. भाजपाला तीन जागी यश मिळाले. सासवड, आळंदी व तळेगाव दाभाडे नगरपालिकेमधील यशात भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या वरचष्म्यामुळे हे यश मिळाल्याचे मानले जाते. एकंदरीत हा तिसऱ्या अंकाचा पडदाही दादांनीच पाडला.
महानगरपालिकेत आता कोण वरचढ ठरणार ?
नगरपालिकानंतर आता पुन्हा महानगरपालिकेत मोहोळ व अजितदादांमध्येच चौथा सामना रंगणार आहे. सर्वच पक्ष वेगवेगळे लढले तर अजितदादांना फटका बसेल असं गणित भाजपाचे होते. परंतु पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला टक्कर देतंय. काँग्रेस व ठाकरेसेना एकत्र आहे. तर शिंदेसेना स्वतंत्र लढतेय. भाजपला येथील लढाई सोपी वाटत होती. परंतु अजित पवारांनी नाराज भाजपमधील काही जण आपल्या पक्षात घेतले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. काका पवारांबरोबर अजितदादांनी युती करत तगडे उमेदवार देत भाजपला कडवं आव्हान उभं केलंय. त्यातून आता थेट युतीमधील दोन पक्षांमध्ये एकमेंकाविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यामुळे प्रचारात दोन पक्षांमधील वाद शिगेला जाणार हे यातून दिसून येत आहे. पण पुण्यात अजितदादा वरचढ ठरणार की मुरलीअण्णा हे मतदारच 15 जानेवारीला ठरवतील.
