Valmik Karad Location : बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. अद्याप ही त्यांच्या कोणताही पत्ता तपास यंत्रणांना मिळालेला नाही. (Valmik Karad ) मात्र, वाल्मिक कराड यांचा मोबाईल 13 डिसेंबर पर्यंत सुरूच होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचे यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे.
फरार झालेले वाल्मिक कराड मध्य प्रदेशात?, कुठ मिळालं लोकेशन? काय आहे नक्की सत्यता?
11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेत. विशेष म्हणजे या फोटोत वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील सोबत असल्याचे दिसत आहे. या फोटोंमुळे आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. वाल्मिक कराड हे फरार असल्याचे सांगितले जात आहे. मग त्यांच्यासोबतचे पोलीस कर्मचारी नेमके काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुनच झाली, असा आरोप होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना आणि हत्येच्या सूत्रधाराला पकडण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आल्यानंतर एकूण 9 पथके संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांचा तपास करत आहेत.
आतापर्यंत सीआयडीकडून वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. जवळपास 100 संशयितांची पोलिसांनी विचारपूस केली आहे. याशिवाय, पोलिसांनी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या फरार मारेकऱ्यांची बँक खाती गोठवली आहेत. तसेच या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या सगळ्यांना आता देशाबाहेर पळून जाणे शक्य नाही.
करण्याच्या तयारीत?
चारही बाजूंनी कोंडी झाल्यामुळे वाल्मिक कराड हे आता पोलिसांसमोर शरणागती पत्कारणार असल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराड यांना रविवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, वाल्मिक कराड हे सोमवारी संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत बीड पोलीस अथवा सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर शरण जातील, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराड पोलिसांनी कधी शरण जाणार आणि त्यांच्या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.