‘कधी कधी वाटतं मोबाईल बंद करावा अन् दिंडीत निघून जावं’; राष्ट्रवादीतील नाट्यावर लंके बोलले

‘कधी कधी वाटतं मोबाईल बंद करावा अन् दिंडीत निघून जावं’; राष्ट्रवादीतील नाट्यावर लंके बोलले

Nilesh Lanke on NCP Political Crisis : राष्ट्रवादीमधील बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच राष्ट्रवादी पक्षात (NCP) दोन गट निर्माण झाल्याने पक्षातील लोकप्रतिनिधी देखील गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. यातूनच पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता केलेल्या विधानामुळे ते सध्या चर्चेत आहे. राजकारणात कधी काय होईल हे समजत नाही. म्हणून मला कधी कधी असं वाटत मोबाईल बंद करून हे राजकारण सोडून सरळ दिंडीत निघून जावं असं वक्तव्य आमदार निलेश लंके यांनी केले आहे.

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित बूथ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य केले. यावेळी बोलताना लंके म्हणाले, मी राजभवनात गेलो तेव्हा मला तेथील परिस्थितीवरून पत्रकरांनी प्रश्न विचारले. पण मी त्यांना सांगितलं मलाच काही माहिती नाही.

आव्हाडही भाजपसोबत जाण्यासाठी अजितदादांना ‘हो’ म्हणाले होते, पण… :

ही घटना माझ्यासाठी शॉकिंग होती. मात्र आपल्यासाठी जरी हे धक्कादायक असले तरी प्रत्येक घटनेमागे काहीतरी इतिहास असतो. कोणताही नेता जो काही निर्णय घेत असतो त्यामागे अनेक घडामोडी असतात. अशा निर्णयांना काही तरी संदर्भ असतात. आपण या गोष्टींच्या खोलात जात नाही कारण आपल्याला त्यामधील काही माहिती नसतं. कारण आपण त्या प्रक्रियेमध्ये नसतो.

आपण कधी कधी कोणता निर्णय घेतला याला भविष्यात जाऊन पहिले तर आपण घेतलेला निर्णय हा योग्यच होता असे वाटते. आपण आज काही निर्णय घेतला तर त्याचे परिणाम आज जरी जाणवले नाही तरी मात्र काही कालांतराने त्याचे परिणाम हे जाणवतात. राजकारणात या सगळ्या गोष्टी गृहीत धरायच्या असतात. हे राजकारण आहे धर्मकारण नाही. मी राजकारणात एवढे उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. तरी मात्र मला असं वाटत की हे राजकारण नको, सगळं मोबाईल वैगरे बंद करून देवदर्शनाला निघून जावं. नाहीतर हे राजकारण सोडून सरळ दिंडीत निघून जावं असं वाटू लागलं आहे, असे गंमतीशीर वक्तव्य आमदार निलेश लंके यांनी केले आहे.

लंके नेमक्या कोणत्या गटात?

आमदार लंके म्हणाले, इथं काही जण सात ते आठ वेळा आमदार झाले मात्र त्यांना देखील या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यावा याबाबत समजत नाही. मात्र आपण तर पहिल्या टर्मचे आमदार आहोत म्हणून आपण एवढ्या जलदगतीने निर्णय नाही घेऊ शकत. कधी कधी काही निर्णय घेताना काळजावर दगड ठेऊन निर्णय हा घ्यावा लागत असतो. तसेच कुटुंबामध्ये सर्वांचे एकमत हे होत नसते यामुळे निर्णय हे वेगळे घ्यावे लागत असतात. आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा मला भविष्यात काय फायदा व काय तोटा होणार याकडे लक्ष द्यावे लागत असते. राजकारणातील पुढील भविष्य पाहून देखील काही निर्णय घ्यावे लागतात असे सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube