Ahilyanagar Minor Girls Molestation Case: अहिल्यानगर: अल्पवयीन मुलींची रस्त्यात छेडछाड करून त्यांना शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी विनायक अर्जुन गारुडकर (वय 22, रा. आंधळे चौरे हौसिंग सोसायटी, बोल्हेगाव) याला न्यायालयाने दोषी ठरविले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, एक महिना कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
प्रकरणातील माहितीनुसार, लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत राहून नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या काही अल्पवयीन मुली 8 मार्च 2014 रोजी शाळेतून रस्त्याने जात होत्या. त्यावेळी विनायक गारुडकर, विकी उर्फ सनी विष्णू शिंदे आणि सावन उर्फ योगेश छगन काळे हे दुचाकीवरून तेथे आले. आरोपींनी मुलींच्या जवळून दुचाकी नेत त्यांना कट मारला आणि अश्लील शेरेबाजी केली. मुलींनी विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. याचवेळी एका मुलीची ओढणी ओढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती शिक्षकांना देण्यासाठी एक मुलगी जात असताना आरोपी तिच्या मागे धावत गेला. त्याने तिची ओढणी ओढून तिच्या कंबरेजवळ हात लावला आणि धमकीवजा वक्तव्य केले. त्याचवेळी संस्थेतील एक शिक्षक तेथे आले. त्यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
आरोपींनी फोन करून आणखी 15 ते 20 जणांना तेथे बोलावून घेतल्याचे तपासात समोर आले. या जमावाने शिक्षकाला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यातील एका व्यक्तीने चाकूने शिक्षकाच्या कमरेजवळ वार करून त्यांना जखमी केले. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीच्या पोटात लाथ मारण्यात आली, तर दुसऱ्या मुलीच्या छातीत बुक्की मारण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकी उर्फ सनी विष्णू शिंदे, सावन उर्फ योगेश छगन काळे आणि विनायक अर्जुन गारुडकर यांच्यासह 15 ते 20 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान विनायक गारुडकर मिळून न आल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर इतर दोन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आणि त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. दरम्यान, गारुडकर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. तर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती गुंजाळ यांनी तपास केला.
