‘राज साहेब, तुम्ही म्हणाले चांगली बातमी येईल, विद्यार्थी वाट पाहतायत’; रोहित पवारांनी पोस्ट करुन केल्या भावना व्यक्त!
Rohit Pawar on Raj Thackeray Post; राज ठाकरेंच्या या पोस्टवर रोहित पवारांनीही एक पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Rohit Pawar on Raj Thackeray Post: पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. लवकरच एमपीएससी विद्यार्थ्यांना (MPSC Students) चांगली बातमी मिळेल, अशी पोस्ट देखील त्यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या या पोस्टवर रोहित पवारांनीही एक पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार! कोकणासह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, परतीचा पाऊसही निराश करणार?
राज ठाकरेंची पोस्ट
राज ठाकरे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती दिली. 5 ऑक्टोबर 2026 रोजी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि रास्त अपेक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. नोकरीसाठी स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंब सोडून संघर्ष करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, असेही त्यांनी म्हटले. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा सकारात्मक झाली असून, येत्या काही दिवसांत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी पोस्टमधून केले. त्यानंतर रोहित पवारांनीही एक पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित पवारांची पोस्ट
रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी हजारो विद्यार्थी गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या शेवटच्या चर्चेत 70 हजार पदांच्या भरतीसह इतर मागण्या मान्य करवून घेतल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चा सकारात्मक झाली असेल, तर मुख्यमंत्र्यांनी ‘विवेक’ दाखवून अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत आणि आयोगाच्या शुद्धीकरणाबाबत निर्णय घ्यावा. राज ठाकरेंनी सांगितलेल्या चांगल्या बातमीची हजारो विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असल्याचंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आदरणीय राज ठाकरे साहेब,
अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाचे संपूर्ण शुद्धीकरण हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आणि जनभावना असून हजारो विद्यार्थी त्यासाठी गेल्या ९ दिवसापासून आंदोलन करत आहेत. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी केलेल्या शेवटच्या चर्चेत ७० हजार पदांच्या भरतीसह बाकी इतर मागण्या विद्यार्थ्यांच्यावतीने मान्य करवून घेतल्याच आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या झालेल्या चर्चेत ते सकारात्मक असतील आणि यातूनच मुख्यमंत्री ‘विवेक’ दाखवत अध्यक्षांचा राजीनामा आणि आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी निर्णय घेणार असतील तर या चांगल्या बातमीची हजारो विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत. चांगली बातमी येईल, ही अपेक्षा..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2026