Download App

NDA सरकारमध्ये महाराष्ट्राचे किती मंत्री? अजितदादांच्या राष्ट्रवादीला लॉटरी; पाहा यादी

नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आघाडीतील आणखी काही मंत्री शपथ घेतील.

Image Credit: letsupp

NDA Cabinet Ministers : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीए आघाडीने सरकार स्थापनेची तयारी केली आहे. नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आघाडीतील आणखी काही मंत्री शपथ घेतील. या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदार असण्याची शक्यता आहे. यातील पहिल्या खासदाराचं नाव निश्चित झालं आहे. प्रफुल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात असतील हे आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल पटेल यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. दरम्यान, मोदींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

इंडिया आघाडीने टाकला होता मोठा डाव… नितीश कुमारांना दिली पंतप्रधानपदाची ऑफर

यंदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपाच्या 63 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बहुमत दूरच राहिले फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एनडीए आघाडीचं बहुमत मात्र झालं आहे. आघाडीतील घटक पक्षांनी समर्थनाचं पत्रही देऊन टाकलं आहे. अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रविवारी मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील काही खासदारांची नावं समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नाव निश्चित केलं आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे उपस्थित होते.

यानंतर उद्याच पटेल मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. यानंतर त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं जातं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याआधी यूपीए सरकारच्या काळात त्यांनी नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केलं आहे. आता एनडीए सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची संधी मिळत आहे. राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे तरी देखील त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे.

सत्तास्थापनेचं ठरलं! नितीश कुमारांच्या पक्षाला किती मंत्रीपदं? वाचा काय आहे गणित

महाराष्ट्रातून ‘या’ खासदारांची नावं चर्चेत

महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, नारायण राणे, उदयनराजे भोसले या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तसेच शिंदे गटातील संदिपान भुमरे आणि प्रतापराव जाधव या दोन खासदारांची नावं मंत्रि‍पदासाठी चर्चेत आहेत.

अन्य राज्यांतील या खासदारांची नावं चर्चेत

राज्याबाहेरील खासदारांत तेलंगणातून जी. किशन रेड्डी, बंदी संजय, एटाला राजेंद्र, डीके अरुणा, डॉ. के. लक्ष्मण. आंध्र प्रदेशातून राम मोहन नायडू, हरीश, चंद्रशेखर, डी. पुरंदरेश्वरी, रमेश आणि बाला शौरी यांची नावं आघाडीवर आहेत. कर्नाटकातून प्रल्हाद जोशी, बसवराज बोम्मई, जगदीश शेट्टार, शोभा करंदलाजे, डॉ. सी. मंजूनाथ, एचडी कुमारस्वामी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. केरळमधून अभिनेते खासदार सुरेश गोपी, व्ही. मुरलीधरन यांचा विचार होऊ शकतो.

follow us

वेब स्टोरीज