Ajit Pawar Death : घड्याळापासून सुरू झालेला प्रवास घड्याळावरच थांबला!

ज्याचं प्रतीक त्यांनी आयुष्यभर जपलं, त्याच घड्याळाने अखेरच्या क्षणी त्यांची ओळख पटवली, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Untitled Design (331)

Untitled Design (331)

Ajit Pawar’s body identified from his watch : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर्ड विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने हे विमान थेट शेतात कोसळले आणि काही क्षणांतच भीषण आगीने पेटले. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डीजीसीआयकडून देण्यात आली आहे.

आज सकाळी सुमारे 8 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. बारामती विमानतळावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात विमान अचानक खाली झुकले, धावपट्टी गाठण्याआधीच जवळच्या शेतजमिनीत आदळले आणि मोठा स्फोट होऊन आग लागली. अपघात इतका भीषण होता की, विमान पूर्णपणे जाळून खाक झाले. आगीच्या तीव्रतेमुळे बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या आणि मृतदेह ओळखणे देखील शक्य नव्हते.

अजित पवार, गोपीनाथ मुंडे…,महाराष्ट्राच्या राजकरणातील ‘या’ बड्या नेत्यांचे अपघाती मृत्यू

अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ हे अजित पवार यांच्या राजकीय ओळखीचे प्रतीक मानले जात होते. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत बहुतेक सर्व निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवल्या. अलीकडील प्रचारसभांमध्येही ‘घड्याळाचा अलार्म वाजवा, घड्याळाला मतदान करा’ असे आवाहन ते सातत्याने करताना दिसत होते. योगायोग असा होता की, ज्याचं प्रतीक त्यांनी आयुष्यभर जपलं, त्याच घड्याळाने अखेरच्या क्षणी त्यांची ओळख पटवली, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

राजकारणात दादा म्हणून ओळख असणारे अजित पवार हे बारामतीचे अनेकदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे वजनदार स्थान होते. प्रशासनावर पकड, आक्रमक भूमिका आणि निर्णयक्षमता यासाठी ते ओळखले जात होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला.

Exit mobile version