Download App

राज्याच्या राजकारणात पुन्हा धक्कातंत्र : अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीर गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. देवगिरी बंगल्यावरील बैठक पार पडल्यानंतर अजितदादांसह सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले. सर्व जण स्वतःहुन भेटीला गेले असल्याची माहिती आहे. (Along with DCM Ajit Pawar and 9 ministers of ncp meet national president Sharad Pawar)

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठकीला अजित पवारांसह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.

शरीराने अजितदादांसोबत… मनात मात्र शरद पवारच! निलेश लंकेंची ‘ती’ कृती ठरली चर्चेची

जयंंत पाटील हे उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होते. मात्र सुप्रिया सुळे यांचा फोन येताच ते बैठक अर्ध्यावर सोडून तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले.

याआधी दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. यानंतर अजित पवार आपल्या काकी असलेल्या प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिल्वर ओकवर गेले होते. यावेळी त्यांची आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती. यानंतर अवघ्या 2 दिवसांतच अजित पवार यांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी

भेटीमागे राजकीय सर्व्हे?

दरम्यान, या भेटीमागे नुकताच आलेला राजकीय सर्व्हेचा धसका आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. नुकताच साम वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार 64% मतदारांची सहानुभूती शरद पवार यांना असल्याचे दिसून आले होते. तर 23.3 टक्के लोकांनी शरद पवारांना सहानुभूती मिळनार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 18 टक्के लोकांनी नाही असे मत नोंदविले होते. तर 18 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे म्हटले होते. अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या मतदारांना पटला नसल्याचे या सर्व्हेतून दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व फुटीर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली का असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us