Amruta fadnavis suresh dhas beed government medical college demand: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) यांच्या वाढदिवसानिमित्त बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचे कौतुक करत बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची मागणी केली.
आधी तरुणांना ऐका, मग ते तुम्हाला ऐकतील; जनरेशन झेडबाबत मोदींचा खासदारांसाठीचा खास सल्ला चर्चेत
अमृता फडणवीस या केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर दिविजा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणूनही काम करत असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले. 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी अमृता फडणवीस यांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेचाही उल्लेख केला.
‘अमृता वहिनींचा आदेश देवेंद्र फडणवीस शंभर टक्के पाळतात’
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत करण्याचा अनुभव मिळाला. मदत करताना जात-पात किंवा धर्म पाहिला नाही, असे धस यांनी सांगितले. तसेच, देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस यांचा आदेश शंभर टक्के पाळतात, असा मिश्कील उल्लेखही त्यांनी केला. बीड जिल्ह्यातील रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मिळाल्याचा उल्लेख करत आगामी काळात फडणवीस यांना या कामासाठी बीडमध्ये आणणार असल्याचे धस यांनी सांगितले.
‘बीडला शासकीय मेडिकल कॉलेज द्या’
यावेळी सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांच्याकडे बीड जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी केली. ‘वहिनीसाहेब, हात जोडून विनंती करतो, साहेबांना सांगा आमच्याकडे शासकीय मेडिकल कॉलेज द्या,’ अशी मागणी धस यांनी केली. बीड जिल्ह्याला मेडिकल कॉलेजची अत्यंत आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गडकरींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, डीपफेक आणि AI जनरेटेड कंटेंट हटवण्याचे आदेश
‘आष्टीमुळे पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आले’
अमृता फडणवीस यांनीही सुरेश धस यांचे कौतुक केले. सुरेश धस हे आपले लाडके आमदार असून, आष्टीमुळेच आपण पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येऊ शकले, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून कृतज्ञता आणि आभार व्यक्त होत असल्याचेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
‘तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत’
आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. ‘तुम्ही आहात तर आम्ही आहोत. तुमच्यामुळेच आम्ही इथे काहीतरी करू शकतो,’ असे त्या म्हणाल्या. अन्याय जास्त झाला की आपण बोलतो, असे सांगत त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी आपणही सदैव उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. सुरेश धस यांनी आपल्याला अशाच प्रकारे कार्यक्रमांसाठी बोलवत राहावे, आपल्याला नागरिकांना मदत करायला आवडते, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.
