Garjana Morcha : ‘जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका’, अनिल देशमुखांची डायलॉगबाजी

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Untitled Design   2026 10 04T134025.450

Untitled Design 2026 10 04T134025.450

Anil Deshmukh launches a scathing attack on Gyanesh Kumar : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत भव्य गर्जना मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा पार पडला. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेलाय या मोर्चात महाविकास आघाडीसह विविध विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी या आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या मोर्चात सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. जो डाले वोट पे डाका, उसका नाम ज्ञानू काका अशी घोषणा देत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला. देशभरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत असून अनेक मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगातील काही अधिकाऱ्यांना देखजील कथित गैरप्रकारांबाबत लेखी तक्रारी केल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच भविष्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

मुश्रीफांची 10 जागांची मागणी, मात्र 9 जागांचा फॉर्म्युला; गोकुळच्या जागावाटपावरून महायुतीत वादाची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मोर्चात जमलेली गर्दी ही जनतेच्या रोषाची साक्ष असल्याचे सांगत त्यांनी हुकूमशाहचा पहिला पराभव महाराष्ट्राच्या क्रांतिभूमीतूनच होईल, असा दावा केला. निवडणूक जिंकल्यानंतर विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता, मात्र यंत्रणांचा वापर करून निकाल बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात दोन कोटी बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक असल्यास फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले. देशात जनतेच्या मतांची चोरी होत असल्याची भावना निर्माण झाली असून विरोधी पक्षांकडून याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांवर आक्षेप घेत त्यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाविकास आघाडी महाराष्ट्रात पराभूत होऊ शकत नव्हती, गैरप्रकारांमुळे सत्तांतर घडवून आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मतांसोबतच रोजगाराच्या संधींचीही चोरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले.

‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा

या मोर्चातून विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी, मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण आणि भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आक्रमकपणे पुढे रेटली. ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ‘गर्जना मोर्चा’मुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version