Download App

लहरी स्वभाव माहीत असूनही अण्णांना पाठिंबा दिला; केजरीवालांच्या अटकेनंतर आपचा नेता भडकला

  • Written By: Last Updated:

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अण्णांना नेहमी पाठिंबा दिला असा रागाचा सूर कधी काळी अण्णांसोबत काम केलेल्या आणि सध्या महाराष्ट्र आपचे उपाध्यक्ष असणाऱ्या विजय कुंभार यांनी आळवला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Maharashtra State Vice President Of Aam Aadmi Party Vijay Kumbhar Post On Anna Hajare)

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची रिस्क भाजपला फायद्याची की तोट्याची?

विजय कुंभार यांची पोस्ट नेमकी काय?

कुंभार यांनी फेसबुक टाकलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, अण्णा हजारे यांच्या बाबतीत मला आदर होता आणि आजही आहे. अण्णांच्या लहरी स्वभावाविषयी माहीत असतानादेखील आणि अण्णांची भूमिका पटत नसतानादेखील माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अण्णांना नेहमी पाठिंबा दिला. त्यांच्या लहरी स्वभावामुळे अनेक कार्यकर्ते अण्णांना सोडून गेले. त्यावेळीही अण्णांच्या भूमीकेबाबत लिहावं असं वाटत होतं. परंतु अण्णा करत असलेल्या काम बघून ते टाळलं. परंतु मागील काही वर्षात अण्णांची भूमिका सिलेक्टिव्ह होऊ लागली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर लिहिणे गरजेचं वाटतं असल्याचे कुंभार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सतीश शेट्टी हत्याप्रकरणी अण्णांनी घेतलेली भूमिका ही मला नेहमीच खटकली. सतीशच्या हत्येनंतर मी माहिती अधिकार कार्यकर्त्यांची होत असलेली हत्या आणि त्याविषयी काय करायचे या संदर्भात एक कार्यक्रम ठेवला होता. अण्णांना प्रत्यक्ष भेटून मी संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन पुढे काय करणार आहोत हे त्यांना मी सांगितले होतं. अण्णांनी त्या कार्यक्रमाला यायचे कबुल केलं होतं. परंतु ते कार्यक्रमाला आले नाहीत. सतीश खरे तर, अण्णांचा कार्यकर्ता. त्यांच्याच संघटनेचा पदाधिकारी परंतु सतीश शेट्टी हत्याप्रकरणी त्यांनी आजतागायत कुठलेही वक्तव्य केल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

सतीश शेट्टी यांच्याकडे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती आली होती आणि अण्णांनी मात्र सतीश शेट्टी यांनी त्या माहितीचा पाठपुरावा करू नये असा आग्रह धरला होता. अर्थातच सतीश शेट्टी यांनी तो ऐकला नाही. काही असलं तरी सतीश शेट्टी प्रकरणाचं गांभीर्य, विविध तपास यंत्रणाचं संशयास्पद वर्तन त्यांनी न्यायालयात घेतलेली विसंगत भूमिका याच्यावर प्रचंड उहापोह झाला. मात्र अण्णांनी आजतागायत त्यासंदर्भात चकार शब्द काढलेला नाही.

दर सोमवारी उपवास, सकाळी योगा… कशी आहे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांची लाइफस्टाईल?

2006 सालची गोष्ट आहे माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्यातील फाईल नोटिंग्ज काढून टाकण्यासंदर्भात शासनाकडून हालचाल चालू झाली. माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीतून फाईल नोटिंग्ज काढून टाकणं म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा आत्मा काढून घेण्यासारखं होतं. शासनाच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल चालू झाली.त्यावेळी आम्ही म्हणजे अरविंद केजरीवाल,प्रकाश कर्दळे, मनीष सिसोदिया, शैलेश गांधी,प्रशांत भूषण आणि मी असे अनेकजण या विषयावर चर्चा करत असू. त्यावेळी प्रकाश कर्दळे यांनी मी अण्णांना जाऊन सर्व वस्तुस्थिती समजावून सांगावी असं सुचवलं आणि मी अण्णांना भेटलो. अण्णांनीही या विषयावर आमरण उपोषण करण्याचं ठरवलं..उपोषण सुरू झालं. उपोषण सुरू झाल्यानंतर शासनाकडूनही काही हालचाली सुरू झाल्या. शासन चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे वातावर निर्माण झाले. त्यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन माहिती अधिकार कायद्या संदर्भात आणखी काहीतरी शासनाला करायला भाग पाडावे असं सगळ्यांचं मत पडलं.

उपोषण सुरू असताना मी अरविंद केजरीवालांची पुण्यात एका पत्रकार परिषदेत ठेवली होती आणि पत्रकार परिषदेनंतर अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांना भेटणार होते. परंतु अचानक पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयातून प्रतिनिधी येतोय असं कळल्यानंतर आम्ही माहिती अधिकार संदर्भात आणखी काही करता येईल का हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद सोडून अण्णांना आधी भेटण्याचे ठरवलं आणि आळंदीच्या दिशेने अरविंद केजरीवाल आणि मी रवाना झालो. परंतु थोडं अंतर जाताच पृथ्वीराज चव्हाण हेलिकॉप्टरने आळंदीला आल्याचं आणि अण्णांनी त्यांची एका बंद गाडीत भेट घेऊन उपोषण सोडल्याचं आम्हाला समजलं आणि आम्ही परत पत्रकार परिषदेसाठी पुण्यात परत आलो.खरंतर अण्णा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आणखी थोडा वेळ थांबले असते तर कदाचित माहिती अधिकार कायद्याच्या दृष्टीने आणखी काहीतरी चांगलं पदरात पडलं असतं.

Letsupp Special : धंगेकर रिटर्न्सची म्हणूनच भाजपला भीती आहे….

त्याआधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना एक फौजदारी नोटीस पाठवली होती. त्या काळात मी,मारुती भापकर, डॉमिनिक लोबो वगैरेनी सामान्य जनतेची आघाडी स्थापन केली होती. निवडणूक काळात दिलेली आश्वासने न पाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना फौजदारी नोटीस पाठवायचे आमचे ठरले. आम्ही अण्णांकडे गेलो. अण्णांनी आम्हाला पाठिंबा दिला.आपण सोबत असल्याचे सांगितले.त्यानुसार आम्ही नोटीस पाठवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अण्णांनी या नोटिसीशी आपला काही संबंध नसल्याचे वर्तमानपत्रांना सांगितल्याच्या बातम्या आम्हाला वाचायला मिळाल्या. खरे तर आम्ही अण्णांना सांगून आणि अण्णांच्या संमतीने ती नोटीस पाठवली होती. परंतु अण्णांनी मात्र नंतर पुर्णपणे घुमजाव केलं.अण्णानी तसं का केलं आम्हाला माहीत नाही. मात्र मुख्यमंत्री कार्यालयातून अण्णांना फोन गेल्याचे आम्हाला नंतर समजले.

वरील घटना या वानगी दाखल आहेत. अशा अनेक बाबी आहेत ज्या वेळोवेळी खटकल्या परंतु अण्णा करत असलेले काम त्यांची तळमळ बघून अनेकदा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. अण्णांनी काय करावे काय करू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ज्यावेळी ते सार्वजनिक विषयावर बोलतात त्यावेळी त्याची दखल घेणे भाग पडते. अलीकडच्या काळात एखाद्या विषयावर भूमिका न घेतल्यामुळे लोक अण्णा हजारेंवर टीका करायचे तेव्हा आम्हाला राग यायचा.अण्णांचं वय,शारीरिक स्थिती आणि आतापर्यंत त्यांनी केलेले काम पाहता अण्णांनी सगळ्याच गोष्टींमध्ये लक्ष घालावे अशी अपेक्षा चुकीची असल्याचं आम्हाला वाटायचं.मागील काही वर्षात देशात आणि राज्यात अनेक गंभीर घटना घडून देखील अण्णांनी त्यावर काहीही भाष्य केलेलं नाही. परंतु अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर मात्र त्यांना अचानक जाग आली.

राजकीय पक्ष कोणतेही आश्वासन देऊ शकतात का? जाणून घ्या, कसा होतो तयार निवडणुकीचा जाहीरनामा…

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे या दोघांबरोबर ही काम केलेलं आहे. दोघांची कार्यपद्धती आणि तळमळ आम्हाला चांगली माहिती आहे. अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांचे एकत्र येणं अवघड आहे.  हे लक्षात आल्यानंतर दोघांनीही एकमेकांचा सन्मान करणं आवश्यक होतं. अरविंद केजरीवाल यांनी अण्णांच्या बाबतीत कधीही चुकीचे किंवा वाईट बोलल्याचं किमान माझ्या ऐकिवात नाही. सामाजिक कार्यकर्ता म्हणून एखाद्या विषयावर बोलणे आणि प्रत्यक्ष त्या यंत्रणेचा भाग होऊन काम करणं याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ही बाब अण्णांनी लक्षात घ्यायला हवी होती. परंतु तसं न करता केवळ एककल्लीपणाने अण्णांनी अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य कुणालाही आवडलेलं नाही. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष व त्यांचे नेते यांना सध्या त्रास दिला जातोय ते पाहता अण्णांनी कोणतही भाष्य करण्यापूर्वी विचार करणं गरजेचं होतं. सध्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणांचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केला जातोय हे अण्णांनी
लक्षात घेणे गरजेचे होतं.असं न करता अण्णांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोक आता त्यांच्याच भूमिकेबद्दल शंका घेऊ लागले आहेत.

follow us

वेब स्टोरीज