Download App

चव्हाणांच्या राजीनाम्याची मुहूर्तमेढ आठ महिन्यांपूर्वीच रोवली होती! शरद पवारांच्या नेत्याचा बडा दावा

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा राजकीय भूकंप झाला आहे. मात्र अशातच या राजीनाम्याची स्क्रिप्ट आठ महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती. अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही, असा मोठा दावा राष्ट्र्वादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. 

लवांडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून याबाबतचा दावा केला आहे. लवांडे म्हणाले, आज माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसोबत दि. 27 की 28 जून 2023 रोजी मुंबईत ‘देवगिरी ‘ या शासकीय बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती. देवगिरीवर त्याच दिवशी अजितदादांनी मला बोलावून घेतले होते. दादांची माझी राजकीय सद्यस्थिती बाबत चर्चा चालू असताना अशोक चव्हाण तिथे आल्यावर मग दादांनी मला आपण नंतर चर्चा करू असे सांगितले व मी तिथून बाहेर पडलो. त्यानंतर त्यांची दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. अजितदादा आणि अशोक चव्हाण यांचा निर्णय तेव्हाच झालेला होता.

Ashok Chavan : ठरलं तर! अशोक चव्हाणांसह आणखी एका आमदाराचा भाजपप्रवेश; आजचाच मुहूर्त

त्यानंतर लगेच दि. 2 जुलै 2023 रोजी अजितदादा मित्र मंडळ राज्य सरकार मध्ये सामील झाले. आता अशोक चव्हाण काँग्रेस मधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. मला त्यात धक्कादायक काहीच वाटत नाही .ते भाजप किंवा कदाचित अजितदादा गटात सुध्दा जातील कारण अजितदादा मित्र मंडळ आणि अशोक चव्हाण हे ईडी ग्रस्त असल्याने समदुःखी आहेत. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपा सोबत गेलेले बरे. असे सद्या देशभर वातावरण आहे. साम दाम दंड भेद या भाजपच्या राजनीतीचे देशाला दररोज दर्शन होत आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपाने जगाला दाखवून दिले आहे. आपली संसदीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात आहे हे नक्की! अशीही टीका लवांडे यांनी केली.

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी

अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

अशोक चव्हाण हे आजच भाजपात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांवर एक सूचक वक्तव्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत.

follow us