Download App

शिंदेंची अनुपस्थिती अन् अजितदादा थेट मुख्यमंत्र्यांच्या जागेवर; खुद्द नार्वेकरांनीच हाताला धरुन बसवलं खुर्चीत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar) येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्याबाबत स्वतः शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा खुलासा करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ना त्या कारणामुळे या चर्चा सातत्याने डोकं वर काढतात. आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात होण्याचे कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची एक कृती. नार्वेकर यांनी आज झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीत थेट अजित पवार यांनाच बसवलं. उपस्थितांमध्ये यामुळे दबक्या आवाजात अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. (Assembly Speaker Rahul Narvekar gave Chief Minister Eknath Shinde’s chair to Ajit Pawar)

नेमकं काय घडलं?

मुंबई आज मनोरा या आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा  कार्यक्रम पार पडला. या क्रार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आणि इतर आमदार, मंत्र्यांना निमंत्रण होते. शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींसाठी खुर्ची आरक्षित ठेवलेली असते. त्यावर त्यांच्या नावाचे स्टिकर्स लावण्यात आलेले असतात. आजच्या कार्यक्रमातही अशाच खुर्च्या आरक्षित करुन ठेवण्यात आल्या होत्या.

नितीन देसाईंना ‘ते’ सहन झालं नाही; देसाईंच्या आत्महत्येवरून राऊतांचा भाजपवर संताप

मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्री शिंदे हे कार्यक्रम उपस्थित राहु शकले नाहीत. त्याचवेळी व्यासपीठावर अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या शेजारील खुर्चीवर बसले होते. मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी आहे आणि अजित पवार पलिकडे बसले आहेत हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची शेजारी बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी स्टिकर काढत अजित पवार यांना त्या खुर्चीत बसवलं. नार्वेकरांची ही कृती पाहुन फडणवीस यांनाही स्मितहास्य करत अजित पवार यांच्या दिशेने पाहिले.

‘याच दबावाने, घिसाडघाईने 20 कामगारांचा बळी घेतला’; ‘समृद्धी’ अपघातांवर ठाकरे गटाचा घणाघात

ही कृती जरी छोटी असली तरीही मागील अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर संकेत म्हणून पाहिले जात आहे. राजकारणात संकेत आणि टायमिंग या गोष्टींना खूप महत्वाचे मानले जाते. मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती आणि त्याच खुर्चीवर अजित पवार यांना राहुल नार्वेकरांनी हाताला धरुन बसवणं अशा घडामोडींमुळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळातही अशाच काही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us