CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोबतच अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. राम प्रभुंचं दर्शन घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या ठिकाणाहून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करू असे शिंदे यावेळी म्हणाले.
शिंदेंसाठी रोहित पवारांचे श्रीरामाकडे मागणे; म्हणाले, तुझ्या दर्शनासाठी आलेल्या राजाला..
ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न देखील आता पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. राज्यातील शेतकऱ्यांवरचे संकट दूर व्हावे. राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समाधानाचे आनंदाचे दिवस यावेत हीच मागणी श्रीरामाच्या चरणी केली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रभू रामाचं दर्शन घेऊन आनंद झाला. एक स्वप्न आता पूर्ण होत आहे. रामाकडे काहीच मागण्याची गरज नाही सगळं मिळतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रामाचे मंदिर पूर्ण झाल्यावर मी परत येईलच असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शिंदे यांचा अयोध्या दौरा सुरू आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यावर विरोधक टीका करत आहेत. त्यातच राज्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवल्याने विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. त्यांनीही या संधीची पुरेपूर वापर करून घेत सरकारची कोंडी केली आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘भगवान प्रभू श्रीराम वनवासाला निघाले म्हणून आपल्या राजावर प्रेम करणारी प्रजा तेव्हा शोकाकूल झाली होती.. आज बेरोजगारी आणि अस्मानी संकटामुळे महाराष्ट्रातील प्रजाही शोक व्यक्त करतेय.. हे प्रभू श्रीराम, मूळ प्रश्नांपासून भरकटू न देता महाराष्ट्रातील प्रजेला या संकटातून बाहेर काढून सुखी समाधानी ठेवण्याची सद्बुद्धी तुझ्या दर्शनासाठी आलेल्या इथल्या राजाला दे आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी तुझा वापर कुणालाही करू देऊ नकोस, ही प्रार्थना ! जय श्रीराम !!! असे ट्विट पवार यांनी केले आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांनी रावणराज्य करणारे अयोध्येला चालले असल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कारभार चांगला चालल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.