शिंदेंसाठी रोहित पवारांचे श्रीरामाकडे मागणे; म्हणाले, तुझ्या दर्शनासाठी आलेल्या राजाला..

शिंदेंसाठी रोहित पवारांचे श्रीरामाकडे मागणे; म्हणाले, तुझ्या दर्शनासाठी आलेल्या राजाला..

Rohit Pawar on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांनी त्यांच्या दौऱ्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रावणराज्य करणारे अयोध्येला चालले असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही हल्लाबोल सुरू केला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला घेरले आहे. राज्यातील प्रजेला संकटातून बाहेर काढून सुखी समाधानी ठेवण्याची सद्बुद्धी तुझ्या दर्शनासाठी आलेल्या इथल्या राजाला दे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

शिंदे यांचा अयोध्या दौरा सुरू आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यावर विरोधक टीका करत आहेत. त्यातच राज्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवल्याने विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. त्यांनीही या संधीची पुरेपूर वापर करून घेत सरकारची कोंडी केली आहे.

काळी टोपी, खाकी पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट… नरेंद्र मोदींच्या वेगळ्या लूकची चर्चा

रोहित पवार म्हणाले, ‘भगवान प्रभू श्रीराम वनवासाला निघाले म्हणून आपल्या राजावर प्रेम करणारी प्रजा तेव्हा शोकाकूल झाली होती.. आज बेरोजगारी आणि अस्मानी संकटामुळे महाराष्ट्रातील प्रजाही शोक व्यक्त करतेय.. हे प्रभू श्रीराम, मूळ प्रश्नांपासून भरकटू न देता महाराष्ट्रातील प्रजेला या संकटातून बाहेर काढून सुखी समाधानी ठेवण्याची सद्बुद्धी तुझ्या दर्शनासाठी आलेल्या इथल्या राजाला दे आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी तुझा वापर कुणालाही करू देऊ नकोस, ही प्रार्थना !  जय श्रीराम !!! असे ट्विट पवार यांनी केले आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांनी रावणराज्य करणारे अयोध्येला चालले असल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कारभार चांगला चालल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा आहे आणि आता उपमुख्यमंत्री सुद्धा येत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. भाजपचे सगळे लोक आले आहेत. आम्ही सगळे एकत्र रामाचे दर्शन घेणार आहोत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube