Download App

बोलताना काळजी घ्या! फडणवीसांनी धाडला संभाजी भिडेंना निरोप? माजी आमदार बनला दूत

सांगली : भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. आज (7 ऑगस्ट) संभाजी भिडे यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. दोघांमध्येही बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान, या भेटीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा निरोप घेऊनच देशमुख यांनी भिडेंची भेट घेतली असल्याच सांगितलं जात आहे. (BJP rural district president and former MLA Prithviraj Chavan met Sambhaji Bhide, founder of Shiv Pratishthan Hindustan)

काही दिवसांपासून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन सातत्याने वाद सुरु आहेत. आधी स्वातंत्र्य दिनावरुन त्यांनी केलेलं विधान वादग्रस्त ठरलं होतं. त्यानंतर महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुनही वादाची राळ उठली होती. यात भिडे यांच्यावर महाराष्ट्रातील काही पोलीस स्थानकात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेससह विविध पक्षांनी आणि पुरोगामी संघटनांकडून भिडे यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी होत होती. विधानसभेतही या वादाचे जोरदार पडसाद उमटले होते.

राष्ट्रवादीत दोन गट असल्याचा पुरावा नाही, निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर

अशातच आज सकाळी पृथ्वीराज देशमुख यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली. आगामी काळात जपून आणि काळजी घेऊन मत व्यक्त करावीत असा फडणवीस यांचा निरोप घेऊन ही भेट झाली असल्याचे सांगितले जात आहे. दोघांच्याही भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. या संदर्भात पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संभाजी भिडेंची सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगितले.

मोठी बातमी : राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल, अधिसूचना जारी

कोण आहेत पृथ्वीराज देशमुख :

देशमुख हे फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्याकडे ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपदही आहे. आगामी काळात सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना थांबवून पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून देशमुख यांना संधी देण्यात आली होती.

Tags

follow us