BRS Harshvardhan Jadhav : बीआरएस पक्ष आता हळूहळू महाराष्ट्रात देखील शिरकाव करत आहे. त्यानंतर हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला जातो आहे. यावर बोलताना बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी हे आरोप फेटाळत भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच कोण काय बोलत आहेत याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. आमच्या पक्षाचे ध्येय धोरण हे निश्चित आहे. आम्हाला राष्ट्र निर्माण करायचे आहे. आम्ही मोदींप्रमाणे हवेत गोळीबार करत नाही. तसेच इतर विचारसरणीचे जे लोक आहेत ते कोण कोणास भेटतंय? काय चर्चा करतायत व कुणाचा मुका घेतंय आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. अशा शब्दात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विरोधकांच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिले आहे.
बीआरएसचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आज अम्हदनगर येथे आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. बीआरएस पक्ष भाजपची बी टीम आहे अशी टीका केली जाते. यावर बोलताना जाधव म्हणाले, आमचं धोरण ठरलं आहे. आम्हाला राष्ट्र निर्माण करायचे आहे. आम्ही जे बोलतो ते काम आम्ही करतो. आम्ही मोदींसारखे हवेत गोळीबार करत नाही. हे कोण काय करतं? याबाबत आम्हाला अजिबात रस नाही, अशा शब्दात जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा
आज शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे. आज बळीराजावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाला नाही आहे. यांच्या सत्तेच्या गोंधळापायी प्रशासनाच्या बैठका या झाल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा तसेच बैठकच झाली नसल्याने शेतकरी हे अडचणीत सापडले आहे. आज जरी देशात आमचं सरकार नाही तरी आम्ही पीककर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांना पीककर्ज देणार आहोत. ही भूमिका आम्ही संभाजीनगरमध्ये पार पाडली आहे. लवकरच आम्ही संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणार आहे.
आम्हाला काही घेणे देणे नाही, कोण सत्तेत जातंय तर कोण जात नाही. मात्र शेतकरी जो आज अडचणींमध्ये सापडला आहे. त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचं धोरण हे निश्चित आहे. शेतकरी वाचला तर देश वाचेल अशी ठाम प्रतिक्रिया माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.