LPG Price Hike : वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर. मात्र या महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका (LPG Price Hike) बसला आहे. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडच्या दरांचा आढावा घेत असतात. यानुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात (Commercial Gas Cylinder) झाली आहे. घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. वाढीव दर आजपासून लागू झाले आहेत. या गॅस सिलिंडरच्या दरात सरासरी 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात सीएनजी गॅसचा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ही दरवाढ फक्त कमर्शिअल गॅसच्या बाबतीत झाली आहे. घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना झटका बसला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. नवे दर IOCLच्या वेबसाइटवर अपडेट केले आहेत. व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांपासून कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत.
आता नवीन दरवाढीनुसार देशाची राजधानी दिल्लीत एक व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 16.50 रुपये वाढ झाली आहे. येथे आता सिलिंडरसाठी 1818.50 रुपये मोजावे लागणार आहेत. आर्थिक राजधानी मुंबईतही प्रति सिलिंडर 16.50 रुपये वाढ झाली आहे. या शहरात आता एक सिलिंडर 1980.50 रुपयांना मिळेल. चेन्नई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 16 रुपये वाढ करण्यात आली आहे. या शहरात आता गॅस सिलिंडरची किंमत 1980.50 रुपये इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोलकाता शहरात गॅसच्या दरात 15.50 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे आता येथे कमर्शिअल गॅस टाकी घ्यायची झाल्यास 1927 रुपये द्यावे लागतील.
महिलादिनी खुशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; PM मोदींची घोषणा
ऑगस्ट महिन्यापासून व्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत राहिली आहे. आता डिसेंबरमध्येही हाच ट्रेंड कायम राहिला आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात गॅस दरात 62 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा सरासरी 18 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आगामी काळात हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील तयार खाद्यपदार्थांचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नई 818.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.