महिलादिनी खुशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; PM मोदींची घोषणा

महिलादिनी खुशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; PM मोदींची घोषणा

PM Narendra Modi Big Announcement on Women’s Day : आज देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात (International Women’s Day) साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) मोठी घोषणा केली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडवर शंभर रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा पीएम मोदी यांनी केली. या निर्णयाची माहिती मोदींनी ट्विट करत दिली. दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला गॅस योजनेला एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्याात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

महिला दिनानिमित्त आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमती 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांचे आयुष्य सोपं होण्यासोबत कोट्यावधी कुटुंबांवरील आर्थिक भारही कमी होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सरकारचा हा निर्णय पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल ज्यामुळे संपूर्ण परिवाराच आरोग्यही अबाधित राहिल असेही पीएम मोदी यांनी म्हटलं आहे.

सरकारी कर्मचारी, पेन्शनर्सनाही गुडन्यूज 

दरम्यान, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारकांच्या महागाई भत्त्यात (Increase in inflation allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून काल घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट! महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ 

महागाई भत्ता आणि सवलतीत वाढ करण्याचा (DA Hike) हा निर्णय यावर्षी १ जानेवारीपासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ४९.१८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाल्याने, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 50 टक्के होईल आणि यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा गृहनिर्माण भत्ता आणि ग्रॅच्युइटीही वाढेल. वेगवेगळ्या विभागांना त्यांच्या पगारानुसार त्याचे फायदे मिळतील.

याच बैठकीत केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला गॅस योजनेला (PM Ujjwala Yojana) एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयानुसार 31 मार्च 2025 पर्यंत उज्ज्वला गॅस योजनेत अनुदानित गॅस सिलिंडर मिळत राहिल. या योजनेत प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. सन 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube