LPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG गॅसच्या दरात मोठ्ठी वाढ
LPG Price Hike : देशातील वाढत चाललेली महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. सरकारकडून कितीही दावे केले जात असले तरी त्यात काही तथ्य दिसत नाही. आताही पाच राज्यांतील निवडणुका संपताच वर्षातील शेवटच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी जोरदार झटका दिला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ (LPG Price Hike) करण्यात आली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 21 रुपये वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत एक सिलिंडरसाठी 1796.500 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, कंपन्यांनी घरगुती गॅसचे दरात मात्र कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी देखील व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाल्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ
ही दरवाढ फक्त कमर्शिअल गॅसच्या बाबतीत झाली आहे. घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना झटका बसला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. नवे दर IOCLच्या वेबसाइटवर अपडेट केले आहेत. दिवाळी सणाच्या आधीही कंपन्यांनी गॅस टाकीच्या दरात तब्बल 103 रुपयांची वाढ केली होती. मात्र छठपूजा उत्सवाआधी काहीसा दिलासा मिळाला होता. सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी कमी होऊन 1775.50 रुपये करण्यात आली होती. मात्र आता डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी वाढ करण्यात आली आहे.
नव्या दरानुसार, दिल्लीत आजपासून 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1775.50 रुपयांऐवजी 1796.50 रुपये झाली आहे. कोलकात्यात 1908 रुपये, मुंबई शहरात 1728 रुपये, तर चेन्नईमध्ये 1968.50 रुपये झाली आहे.
घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही
या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दोन महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात दर कपात करण्यात आली होती. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर ऑगस्ट महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये तर चेन्नई 918.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.
सावधान..! एलपीजी गॅस आरोग्यासाठी किती सुरक्षित? स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संशोधन अहवाल
सप्टेंबरमध्येही दरात केली होती कपात
दरम्यान, याआधी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 157 रूपये कमी किंमतीत मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 19 किलोंचा असतो. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी केल्याने अप्रत्यक्षपणे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. आता मात्र या महिन्यात थेट दोनशे रुपयांनी वाढ करत सरकारने हा दिलासा फार काळ टिकू दिला नाही.