Teachers movement in Rayat : रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत (Teachers) राज्यभरात पवित्र पोर्टलमधून ११ हजार ८५ उमेदवारांची विनामुलाखत निवड झाली. मात्र, मागील चार ते पाच महिन्यांपासून न्यायालयीन प्रकरणाचे कारण समोर करत या भावी शिक्षकांना ‘रयत’ने रुजू करून घेतलेच नाही. शिक्षण आयुक्त कार्यालयाचे उंबरठे झिजविले, मंत्री, नवनियुक्त खासदारांनाही निवेदने देऊन झाली, मात्र मार्गच निघत नसल्याने अखेर राज्यभरातील २०० पेक्षा जास्त शिक्षकांनी आज सकाळपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला
बेमुदत आंदोलन
विशेष म्हणजे यामध्ये दहा महिने, एक वर्षांच्या बालकांसह शिक्षिका भर रस्त्यावर झोपल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने फेब्रुवारी २०२२ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे ११ हजार ८५ जणांची यादी प्रसिद्ध केली. त्यातील सर्वात जास्त गुण असलेले ६४५ जणांनी रयत संस्थेला प्राधान्य दिलं होतं. मात्र, अद्याप यातील एकालाही नियुक्तीपत्र मिळालेले नाही. नियक्त्या न मिळालेले भावी शिक्षक, शिक्षिका काल रात्रीच भंडारा, गोंदिया, नागपूरपासून मिळेल त्या वाहनाने प्रवास करत भल्या पहाटे पुणे गाठलं आणि सकाळी सकाळी बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. दोनशेवर आंदोलकांचा रात्री अक्षरशः रस्त्यावर मुक्काम असल्याचे आंदोलकांनी सांगितलं.
बाळ दुधासाठी रडतंय
भर उन्हात आंदोलनाला बसलेल्या एका भावी शिक्षिकेने सांगितलं की, तीचं सासर नगर जिल्ह्यात आहे, तिथून ती सांगलीला माहेरी गेली, माहेरी दीड वर्षाच्या बाळाला ठेवलं, अन् पुण्यात आंदोलनात सहभागी झाली. महत्त्वाचं म्हणजे आई दिसेनासी झाली, भुक लागल्यानं ‘माझं लेकरु दुधासाठी रडतंय, अन् मी इथं नोकरीसाठी रडतेय’ या शब्दात व्यक्त होताना भावी शिक्षिकेला अश्रूही अनावर झाले होते.
जॉबची ऑफर आली अन् पठ्ठ्यानं क्रिकेटच सोडलं; 16 हजारी फलंदाजाचा क्रिकेटला गुडबाय..
काय आहेत मागण्या?
निवड झालेल्या ६४५ जणांपैकी ९० जण मराठवाड्यातील आहेत. ६४५ जणांना नियुक्ती मिळण्यासाठी आधीच पाच महिने विलंब झाला. त्यामुळे त्यांच्या सेवापुस्तिकेवर या कालावधीची नोंद होणार नाही. त्यामुळं तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. रयतमध्ये नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये समायोजन करावे. तत्काळ वेतन आदेश देता येत नसेल तर पात्र उमेदवारांना आदेश मिळेपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार मानधन द्यावे.
लेखी हमी द्या
गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून पाच महिने झाले आहेत, नियुक्ती देण्यात जितका अधिकचा कालावधी लागेल तितका कालावधी शिक्षण सेवक कालावधी म्हणून गृहित धरावा, शिफारस पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांना आठ दिवसांत नियुक्ती आदेश द्या अन्यथा भविष्यातील उमेदवारांच्या आर्थिक, शैक्षणिक, मानसिक नुकसान होणार नसल्याची लेखी हमी द्या आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.