पुणे : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला. (Chief Minister Eknath Shinde along with the entire Cabinet of Maharashtra, MPs, MLAs will go to Ayodhya to have darshan of Lord Shri Rama on February 5.)
यानंतर आता अयोध्येमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकारणी मंडळी आणि भक्तांचा ओघ वाढत आहे. हजारोंच्या संख्येने नागरीक अयोध्येत हजेरी लावत आहेत. यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचाही नंबर लागणार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार येत्या पाच फेब्रवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. याबाबत आज (24 जानेवारी) अधिकृत घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आपण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला एकटे उपस्थित राहणार नाहीत तर संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊनच अयोध्येत जाणार असल्याची एक्स अकाउंटवर घोषणा केली होती.
जय श्रीराम, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे कोट्यावधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार.. अयोध्येत सोमवारी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच.
देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे त्यांनी म्हंटले होते.
त्यानुसार अयोध्या दौऱ्याची तारीख ठरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार येत्या पाच फेब्रवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.