मंगेश चिवटे यांनी फेसबुक पोस्टमधून भेट घेतल्याची आणि चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, अंतरवाली सराटी, जि. जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार भेट घेतली. तसेच मुंबई येथील लिलावती हॉस्पिटल व गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर मधील जखमी उपोषणकर्ते यांच्या समवेत व्हिडीओ कॉल द्वारे बोलणे करून दिले. तसेच रुग्णांचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः करणार आहेत असे जाहीर केले.
दरम्यान, काल रात्री मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर आज ते उपचार घेण्यासाठी तयार झाले. यानंतर तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले. एवढ्या दिवसांच्या उपवासानंतर मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना आज (17 सप्टेंबर) उपचारासाठी अंतरवाली सराटी येथून रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
छत्रपतीत संभाजीनगरमध्ये जात असताना ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आलं. या हॉस्पिटलमध्ये आता जरांगे यांच्या सर्व चाचण्या आणि उपचार केले जाणार आहेत. उपचार घेण्याबद्दल आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. उपचार घेतल्यानंतर आपण पुन्हा उपोषणस्थळी जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.