College professor brutally murdered over petty dispute in Mumbai : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आलोक सिंह यांचा लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून निर्घृण खून झाला. मिळालेल्या माहितीनुसार बोरिवलीहून येणाऱ्या लोकलमधून मालाड स्टेशनवर उतरत असताना आलोक सिंह यांचा ओंकार एकनाथ शिंदे या तरुणाशी वाद झाला. गर्दीमध्ये उतरताना धक्का लागल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पुढे महिलाही उभ्या असल्याने धक्का देऊ नये, असे आलोक सिंह यांनी सांगितले. मात्र हा किरकोळ वाद काही क्षणांतच तीव्र भांडणात रूपांतरित झाला.
वाद वाढताच आरोपी ओंकार शिंदे याने आपल्या खिशात असलेली एक टोकदार वस्तू काढून आलोक सिंह यांच्या पोटात वार केला आणि गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या आलोक सिंह यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या हल्ल्यात चाकूचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता एक वेगळीच बाब समोर आली. आलोक सिंह यांच्यावर चाकू नव्हे, तर हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरला जाणारा खास धातूचा चिमटा वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Nalasopara Crime : धक्कादायक, नालासोपाऱ्यात आईकडून 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या
आरोपी ओंकार शिंदे हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहणारा असून तो दक्षिण मुंबईतील खेतवाडी भागातील एका मेटल कारखान्यात काम करतो. भांडणाच्या वेळी रागाच्या भरात त्याने हा चिमटा वापरून वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून पळताना त्याने वापरलेला चिमटा फेकून दिल्याची कबुली दिली असून, तो चिमटा शोधण्याचे काम रेल्वे पोलीस सध्या करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत आरोपीने एकच वार करून तात्काळ पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, वापरण्यात आलेली वस्तू अत्यंत टोकदार असल्याने जखम गंभीर ठरली आणि त्यातूनच आलोक सिंह यांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी तब्बल 12 तासांच्या शोध मोहिमेनंतर आरोपी ओंकार शिंदे याला मालाड स्थानक परिसरातून अटक केली आहे. सध्या त्याला बोरिवली येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
