Harshavardhan Sapkal : विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये फूट दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस देखील या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यकडून देण्यात आली आहे.
सुरुवातीला महाविकास आघाडीकडून (MVA) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु होती मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) उद्या 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आता या निवडणुकीत काँग्रेस देखील उमेदवार देणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांच्याकडून करण्यात आल्याने उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काँग्रेसकडून राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा संख्याबळानुसार महाविकास आघाडी 9 पैकी एक जागा जिंकू शकते. तर भाजप 5 शिवसेना शिंदे गट 2 आणि अजित पवार गट एक जागा जिंकू शकते.
सर्वात मोठी बातमी ! अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार
निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार , राज्यातील 9 विधान परिषदेच्या जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 एप्रिल शेवटचा दिवस असणार असून 4 मे रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
