पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल (13 ऑगस्ट) गुप्त भेट झाल्याची सांगितलं जात आहे. पुण्यात कोरेगाव पार्कमधील प्रसिद्ध उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे. मात्र चोरडिया यांनी अशा प्रकारे कोणतीही भेट आणि बैठक झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मात्र कोरेगाव पार्क परिसरातील 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याच्या वृत्ताला उपस्थित पत्रकारांनी आणि नेत्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय खलबत झाली याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. (DCM Ajit Pawar meet NCP chief Sharad Pawar discussion on come together)
दरम्यान, दोघांच्या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचा वृत्तांत आता हळू हळू समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनीही आपल्यासोबत आणि पर्यायाने भाजपसोबत यावं, शरद पवार यांनी सार्वजनिक व्यासपीठावरुन आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती अजित पवार यांनी शरद पवार यांना केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही गट एकत्रितपणे भाजपसोबत आल्यास केंद्रात मंत्रिपद निश्चित असल्याचेही अजित पवार यांनी शरद पवारांना आश्वासन दिले असल्याचे सांगितले जाते.
अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट पूर्वनियोजित होती, आधी एका हॉटेलमध्ये ही भेट होणार होती. मात्र चोरडिया यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीबाबत दिल्लीलाही पूर्वकल्पना होती. या भेटीवर दिल्ली आणि राज्यातील भाजपचे नेते लक्ष ठेवून होते, अशी माहितीही सुत्रांनी दिली. त्यामुळे दिल्लीतून आलेल्या निरोपाच्या पार्श्वभूमीवरच दोन्ही नेत्याांमध्ये खलबत झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या भेटीदरम्यान, पक्षात एकोपा रहावा, कोणतीही कटूता येऊ नये, यामुळे सर्वांनी एकत्र यायला हवं. सर्व खासदार, आमदार एकत्रितपणे भाजपसोबत आल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल. याशिवाय तुम्ही आशीर्वाद दिल्यास, सगळ्यांच्या दृष्टीने चांगले होईल, एखाद्या सार्वजनिक व्यासपीठावरुन हा संदेश सर्व मतदारांना गेल्यास आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश हाती लागले, असा विश्वास अजित पवार यांनी शरद पवार यांना दिला. मात्र, या सर्व गोष्टींना शरद पवार यांनी ठाम नकार दिल्याचे सांगितले जात आहे.