Download App

अडीच वर्षांत आम्हाला फुटकी कवडीही मिळाली नव्हती; फडणवीसांचा ठाकरेंवर आरोप, अजितदादांना क्लिनचीट!

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एक नवीन पायंडा राज्यात सुरु झाला, एका फुटक्या कवडीचा निधीही विरोधी आमदारांना मिळाला नाही. तुम्ही कोविडचे कारण सांगता, पण हा कोविड फक्त विरोधी पक्षासाठी होता का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेत निधी वाटपावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत बोलत होते. (DCM Devendra Fadnavis reply on allegations made by opposition leader ambadas danave on fund distribution)

अंबादास दानवेंचे आरोप :

ठाकरे गटाच्या आमदारांना या वर्षात कोणताही निधी देण्यात आलेला नाही. जिल्हा नियोजन समित्यांवर सापत्न वागणूक दिली जात आहे. जो निधी मंजूर झाला होता, त्याला दिलेली स्थगिती अद्यापही उठवलेली नाही. ही भूमिका चुकीची आहे. अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल. आपला वैचारिक विरोध आहे. वैक्तिगत वैर नसायला पाहिजे. जर असं ठेवतं असेल तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही लोकांना सांगू हे निधी देतच नाहीत. लोकं तुम्हालाच शिव्या देतील. फक्त आमदार निधी आहे, त्यावरच आमदारांचं सुरु आहे. बाकीचा निधी येतच नाही.

उद्धव ठाकरे गटाचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच मोठा आरोप; अधिवेशन पुन्हा तापणार?

अधिवेशन चालू आहे, हिशोब द्यावा. विधानसभेत नसेल द्यायचं तर एखादं प्रसिद्धीपत्रक काढावं. विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेत जे काही 58-59 आमदार आहेत त्यांना किती निधी दिला याचा हिशोब देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा. पण आपण महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांना सापत्नतेची वागणूक दिली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनाही देत होता, ते आता तुमच्याकडे आले की त्यांना निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आरोपांवर ठाम आहोत, असा आरोप काल (23 जुलै) अंबादास दानवे यांनी केला होता.

फडणवीसांचं प्रत्युत्तर :

यानंतर सभागृहात निधी वाटपाविषयीची चर्चा पार पडली. यावेळी फडणवीस म्हणाले, आमदारांना निधी देण्यासाठी एक निहित प्रक्रिया असते. ईपीसीमध्ये त्यात अंतिम निर्णय होतो. मी 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण निधीवाटपावरून एकदाही चर्चा या सभागृहात झाली नाही, कारण तशी वेळच आली नाही. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एक नवीन पायंडा राज्यात सुरु झाला, एक फुटकी कवडी निधी विरोधी आमदारांना मिळाला नाही. तुम्ही कोविडचे कारण सांगता, पण हा कोविड फक्त विरोधी पक्षासाठी होता का? तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणार नाही.

याच अर्थसंकल्पात काँग्रेसच्या आमदारांना सुद्धा आम्ही निधी दिला आहे. तुम्ही कसेही वागला असाल तरी आम्ही मात्र कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मेरिटवर काही काँग्रेसच्या आमदारांची स्थगिती उठवली आहे. त्यात माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. हे असं शकतं की जिथं आम्हाला 25 कोटी मिळाला तिथं त्यांना एखाद्या ठिकाणी पाच-दहा कोटीच मिळाला असेल, हे मी मान्य करतो. हे विधान सभेतील चित्र आहे. तुम्ही विधान परिषदेतील प्रश्न मांडला आहे, त्यावर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल,  असं म्हणतं फडणवीस यांनी निधीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं.

अजितदादांना क्लिनचीट :

यावर विरोधी बाकांवरुन तेव्हाचे अर्थमंत्री अजित पवार आता तुमच्याच सोबत असून आताही तेच अर्थमंत्री आहेत, असं सांगण्यात आलं. त्यावर फडणवीसांनी अर्थमंत्री नाही तर राज्याचा जो प्रमुख असतो, त्या प्रमुखाच्या परवानगीशिवाय आणि सहीशिवाय एक नवा पैसाही मंजूर होत नाही आणि खर्च होत नाही, असं म्हणतं पुन्हा एकदा त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पण यात महाविकास आघाडी काळात अर्थमंत्री असलेले आणि निधी न दिल्याचा आरोप झालेल्या अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे क्लिनचीट दिली.

Tags

follow us