Dilip Walse Patil : माझी कन्या निवडणूक लढवायला तयार नाही म्हणून नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल असं राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) राष्ट्रवादी काँग्रेस जन सन्मान यात्रेत बोलताना म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत तर त्यांची कन्या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती मात्र आज दिलीप वळसे पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या सभेत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यात आता विधानसभा निवडणूक लागणार आहे. आपल्याला या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकतीने आणि हिंमतीने लढायची आहे आणि जिंकायचे पण आहे आणि ते आपण जिंकणारच आहोत. काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवत आहेत की या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत तर त्यांची कन्या निवडणूक लढवणार आहे. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल असं या सभेत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले.
या सभेत बोलताना दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, मागील 30-35 वर्ष तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा दिला आहे आणि मला सांभाळलं. या काळात आपण अनेक शेतीचे प्रश्न मार्गी लावल्याचे काम केले आहे तर काही पाण्याचे प्रश्न देखील सोडवले आहे. पुढील पाच वर्ष मी आता रात्रंदिवस काम करणार आहे. आपली ककामं पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भाने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे त्यादृष्टीने सर्वांनी मदत करा. असं देखील यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले.
लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल : अजित पवार
या सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आम्ही काम करणारे माणसे आहे, बंद करणारे नाही. आम्ही योजना पुढे नेणारी माणसे आहे. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांना विचारा 1999 आणि 2004 चा काळ. निवडणुकीपूर्वी वीज माफी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला होता ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं मी म्हणालो, योजना पुढे चालू ठेव्याची तर त्यांनी आम्हाला सांगितले, निवडणूक झाली आपलं भागलं आता योजना बंद. असलं माझ्याकडून होणार नाही. हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुती तसं करणार नाही. तसेच ही योजना बंद करायची की सुरु ठेवायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल जर तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर ही योजना सुरु रहाणार असं अजित पवार म्हणाले.
‘आई-बापानं जन्माला घातलं म्हणून …’, अजित पवारांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर
तर सभेत बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, विरोधकांना काही काम नाही. ते आमच्यावर खोटे आरोप करत आहे. आमच्याकडून मागच्या वेळी काही गोष्टी चुकल्या ते आम्ही कबूल केल्या आहे. आता कांद्याला बरा भाव आहे. टोमॅटोला बरा भाव आहे. आता आम्ही त्यांना सांगितले आहे की, अजिबात कांदा निर्यात बंदी करायची नाही. त्यामुळे आता कांदा निर्यातबंदी होणार नाही. असेही यावेळी अजित पवार म्हणाले. जनतेचा सम्मान करण्यासाठी आम्ही जन सन्मान यात्रेचे आयोजन केले आहे असं देखील यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.