Eknath Shinde Ministers Warning: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत काही मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत शिंदे यांनी त्यांना कामात सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीदरम्यान चार मंत्र्यांच्या कामगिरीबाबत शिंदे यांनी गंभीरपणे चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. संबंधित खात्यांमध्ये अपेक्षित कामे वेगाने होत नसल्याने त्यांनी मंत्र्यांना थेट जाब विचारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
संजय शिरसाटांचे मंत्रिपद धोक्यात? ‘त्या’ भेटीनंतर भाजपसह एकनाथ शिंदेही नाराज
तीन मंत्र्यांची नावे चर्चेत
या बैठकीनंतर ज्या चार मंत्र्यांच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे, त्यापैकी तीन मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat), मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा समावेश आहे.
‘कामगिरी सुधारा, अन्यथा खांदेपालट’
खात्यांच्या कामकाजात होणारा विलंब, अपेक्षित कामांना लागणारा वेळ आणि प्रशासनाच्या पातळीवरील दिरंगाई याबाबत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. ‘कामात सुधारणा करा, अन्यथा खांदेपालटाची वेळ येऊ शकते,’ अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांना इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आगामी काळात या मंत्र्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. शिवसेनेतील या बैठकीनंतर मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्रीमंडळाच्या बदलाची (Cabinet Reshuffle) चर्चा पुन्हा रंगली असून, संबंधित मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आणि कामकाजात नेमक्या कोणत्या सुधारणा होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा?
या बैठकीकडे केवळ पक्षांतर्गत बैठक म्हणून न पाहता मंत्र्यांच्या कार्यक्षमतेच्या (Minister Performance Review) दृष्टीनेही पाहिले जात आहे. आगामी काळात कामगिरीत सुधारणा न झाल्यास काही मंत्र्यांच्या पदांबाबत निर्णय होऊ शकतो, अशी राजकीय चर्चा आहे.
काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एका वाक्यात उत्तर
