मिमिक्री करायची असेल तर चित्रपटात जा; राहुल गांधींच्या वर्तनावर एकनाथ शिंदेंचा उपरोधिक टोला

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केल्याचा दावा केला.

Untitled Design (57)

Untitled Design (57)

Eknath Shinde’s sarcastic jibe : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केल्याचा दावा केला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताचा जगभरातील नावलौकिक वाढला असून, विरोधकांना देशाची प्रगती आणि विकास दिसत नसल्यामुळे ते सातत्याने मोदींवर टीका करत असल्याचे शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची दखल घेत जगातील 34 देशांनी त्यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ही बाब भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची साक्ष असल्याचे ते म्हणाले. जगभरात इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले असताना भारताला अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले नाही. यामागे मोदी यांचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि प्रभावी विदेशनीती कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर भाष्य करताना शिंदे यांनी गंभीर आरोप केले. हे आंदोलन केवळ राजकीय निषेध नसून घातपाताचा कट असल्याचे त्यांनी म्हटले. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांची टिंगल करणे ही लोकशाहीची पद्धत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, अमित शाह यांनी चर्चेसाठी तयारी दर्शवूनही काँग्रेस चर्चेला तयार झाली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला.

कंस आणि रावण मुस्लिम नव्हते; धर्मावर भाष्य करताना आदिल हुसैन यांची परखड भूमिका

काँग्रेसचा इतिहास देशाला माहिती असून, चर्चेदरम्यान अमित शाह यांनी तो इतिहास जनतेसमोर आणला असता, या भीतीपोटी काँग्रेसने चर्चेपासून पळ काढल्याचा दावा त्यांनी केला. एनडीए सरकारवर टीका करणाऱ्यांनी काँग्रेसचा इतिहास तपासावा, असे सांगताना शिंदे म्हणाले की, काँग्रेसने अनेकदा लोकशाहीची गळचेपी केली आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी काँग्रेसची अवस्था झाली असून, त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, ते परदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात. मात्र, मोदी यांच्या विदेशनीतीमुळे भारताला कधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर तोटा सहन करावा लागलेला नाही. कोविड काळात भारताने अनेक देशांना मदतीचा हात दिला आणि त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा अधिक मजबूत झाली, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर होता, आहे आणि भविष्यातही राहील. राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. रायगडावर झेंडावंदन भरत गोगावले हेच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

पोलीस प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा आरोप

अन्नभेसळीच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली. दूध, खवा आणि पनीरसारख्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ ही लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. अशा भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले असून, दोषींना थेट तुरुंगात पाठवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात आपली तुकाराम मुंढे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली.

महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, महिलांचा अपमान करणाऱ्यांना राज्यातील महिला योग्य उत्तर देतील. या महिला आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या अशा लोकांना त्यांची जागा दाखवून देतील, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तनावर टीका करताना शिंदे यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेता हे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. मात्र, काही नेते सध्या टीका, टिप्पणी आणि मिमिक्री करण्यात व्यस्त आहेत. जर मिमिक्रीच करायची असेल तर त्यांनी राजकारणाऐवजी चित्रपट क्षेत्रात काम करावे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version