Download App

मंत्रिपद सोडा अन् मग बोला! पृथ्वीराज चव्हाणांचा रुद्रावतार, भर सभागृहात भुजबळांना सुनावले

मुंबई : मंत्रीपदाची शपथ घेता तेव्हा आपल्यावर काही जबाबदारी येते. आपल्याला काही बोलायचे असेल तर आपण आवश्य बोला. पण पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर जावून मग आपण वाटेल ते बोला. तुम्ही मंत्रिमंडळात राहून या गोष्टी करु शकत नाही, असे खडे बोल सुनावत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) भर सभागृहात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्यावर संतप्त झालेले पाहायला मिळाले. हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील मराठा आरक्षणाच्या चर्चेवेळी हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळाला. (Former Chief Minister Prithviraj Chavan got angry with Minister Chhagan Bhujbal)

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा दोन समाजात संघर्ष तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. या मागणीला ओबीसी संघटनांसह मंत्री भुजबळ यांनी विरोध दर्शविला. यानंतर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भुजबळ यांनी जरांगे पाटील आणि मराठा बांधवांची मागणी शक्य नसल्याचे सांगत जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. याचमुळे दोन समाज आमने-सामने आल्याचे चित्र उभे राहिले होते.

Sanjay Raut : ‘मोदींनी पकोडे तळायला सांगितलंय ना’.. राऊतांचा अजितदादांना खोचक टोला

यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याचे मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधिमंडळाचा म्हणजे राज्याच्या जनतेला जबाबदार असते. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो मंत्रिमंडळात घ्या. तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे कुणबी सर्टिफिकेट बंद करायचे, काय करायचे ते करा. पण तुम्ही समाजामध्ये जाऊन आवेषपूर्ण भाषणे करुन समाजामध्ये तेढ निर्माण करणे थांबवायला हवे. तुम्ही दोघे जण बसा, मागण्या करा, पटल्या तर मान्य करा. पण बाहेर जाऊन समाजासमाजामध्ये भांडण लावायची हा काही आपला पॉलिटीकर गेम प्लॅन आहे का? हे आम्हाला समजत नाही.

भुजबळांचे चव्हाणांना प्रत्युत्तर :

प्रश्न असा आहे की संपूर्ण बीड पेटल्यानंतर, या सभागृहातील दोन दोन सदस्यांची घरं पेटल्यानंतर, बायका-मुलेही अडकल्यानंतर आणि राख रांगोळी झाल्यानंतर जाऊन बघणं तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं. आपला साधा मनुष्य असेल आणि त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो. इथे या सभागृहातील दोन दोन सदस्यांची घरं पेटवल्यानंतर मी तिथे बघायला गेलो. मी पाहिल्यानंतर मात्र स्वतःला रोखू शकलो नाही हे काय चाललंय?

शिंदे समिती हैदराबादमधून रिकाम्या हाताने परतली; राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम पूर्ण!

दोन महिन्याचे ते सातत्याने जे काय बोलत होते ते मी शांतपणे ऐकत होतो. काय करायचं ते करा. पण मंत्र्याचे काही काम नाही का? मंत्र्याची काही जबाबदारी नाही का? त्याला ह्रदय नाही का? जे चूक आहे ते चूक आहे हे सांगणे काम नाही का? तुम्ही लोकांचे जीवघेणे प्रकार थांबले पाहिजेत, हे सांगणे माझे काम नाही का? ते मी केले. त्यांच्या समाजातील कोण त्यांच्या बाजूने बोलत असले तर दुसराही एक समाज आहे त्याचे सुद्धा काही तरी म्हणणे आहे. हे म्हणणे मी मंत्रिमंडळात देखील मांडले. बाहेर जर मला शिवीगाळ होत असेल हल्ले होत असतील तर मी एकदा नाही 100 वेळा बोलणार, असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

चव्हाण भुजबळांना भिडले :

यावर चव्हाणांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर जावून जे काही बोलायचे ते बोला असे म्हणत खडे बोल सुनावले. ते म्हणाले, आज जरांगे पाटील काही बोलत असतील तर मुख्यमंत्री त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील. पण आपण मंत्रिमंडळातील सदस्य आहात. जेव्हा मंत्रीपदाची शपथ घेता तेव्हा आपल्यावर काही जबाबदारी येते. त्यामुळे आपल्याला काही बोलायचे असेल तर आपण आवश्य बोला. पण पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर जावून मग आपण वाटेल ते बोला. तुम्ही मंत्रिमंडळात राहून या गोष्टी करु शकत नाही, हा मुख्यमंत्र्यांवरील अविश्वास आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समर्थ आहेत, आपण त्यांना सांगा. पण समाजामध्ये तेढ निर्माण करु नका अशी माझी हात जोडून विनंती आहे, असेही ते म्हणाले.

Tags

follow us