ईश्वरपूरमध्ये भाजपला धक्का, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

NCP Sharad Chandra Pawar :  गेली 50 वर्षे ईश्वरपूर शहराच्या राजकारणात भाजपाचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष

NCP Sharad Chandra Pawar

NCP Sharad Chandra Pawar

NCP Sharad Chandra Pawar :  गेली 50 वर्षे ईश्वरपूर शहराच्या राजकारणात भाजपाचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटील यांचे सुपुत्र व भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटील यांचे बंधू महेश पाटील आणि माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी काल (10. नोव्हेंबर) जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. भाजपाच्या या दोन निष्ठावंतांच्या प्रवेशाने ईश्वरपूर शहरचे राजकारण कमालीचे फिरले आहे. पालिकेच्या राजकारणावर सावध व बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या जयंतराव पाटील यांनी हा प्रवेश घेऊन पहिला डाव टाकला आहे.

विरोधी भाजप (BJP) समविचारी पक्षांना हा मोठा झटका मानला जातो. लवकरच आणखी काही दिग्गज राष्ट्रवादीत येतील असे पाटील यांनी सांगितले. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेसाठी (Ishwarpur Municipality) नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व प्रभागातील उमेदवारांबाबत विकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकांचा फार्स गेले दहा दिवस सुरु आहे. यात काही निष्ठावंतांना डावलून प्रक्रिया सुरु असल्याचे दिसल्याने या दोघांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राज्यात भाजपा मित्रपक्षांचे सरकार असूनही भाजपाचे निष्ठावान असलेल्या महेश पाटील व विजय कुंभार यांनी केलेला प्रवेश भाजपासाठी आत्मचिंतन करायला लावणारा ठरेल. यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते तर विजय कुंभार अभ्यासू नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रवेशाने शहराच्या विकासाला गती येईल. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांना दुप्पट बळ मिळेल. शहराच्या भविष्याविषयी काळजी असलेले हे लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. ईश्वरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला अनेक स्वप्न होती. त्या स्वप्नांची पूर्तता करायला हे शहर अधिक गतिमान झालं पाहिजे.

या शहरातल्या रखडलेल्या कामांना अधिक वेगाने पुढे नेले पाहिजे. शहरातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या इतर शहरांसारख्या सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात हा माझा प्रयत्न राहणार आहे. आमच्यावर विश्वास ठेवून अजूनही काही लोक प्रवेश करणार आहेत असे जयंतराव पाटील यांनी सांगितले. महेश पाटील म्हणाले, आमचे घर भाजपचे एकनिष्ठ घर म्हणून 50 वर्षे शहरात परिचित आहे. आजही माझ्या घरावर भाजपचा झेंडा आहे. भाजप सोडताना प्रचंड वेदना होत आहेत. मात्र शहरात नगराध्यक्ष कोण असावा व पालिकेत नगरसेवक कोण असावेत हे तीन गुंडांच्या टोळ्या एकत्र येऊन ठरवू लागल्या आहेत. ते आम्ही चालू देणार नाही.

वडील अशोकराव पाटील यांचा विचार जयंत पाटील यांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊ. शहरातील नागरिकांवर अन्याय होता कामा नये ही कळकळ आहे. प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवारीबाबतच्या बैठकीत मोक्यातील आरोपीचे नाव पुढे आले. नगरसेवकपद हे अंतीम ध्येय नाही. पण गुंड नगरसेवक होत असेल तर आम्हाला त्याची गरज नाही.त्या बैठकीला माझे सख्खे बंधू व चुलत बंधू उपस्थित असूनही काही बोलले नाहीत. गुन्हेगार पालिकेत शिरकाव करीत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी जयंतराव पाटील यांनी आम्हाला ताकद द्यावी. विजय कुंभार म्हणाले, जयंतराव पाटील यांच्यासारख्या सक्षम व एकमुखी नेतृत्वाखाली काम केल्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही. विरोधी आघाडी मजबूत आहे असे अनेकांना वाटते, मात्र आघाडीत गट-तट वाढले आहेत. अनेक निष्ठावंतांना डावलले जात आहे. त्यामुळे जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी फेक, अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; ईशा देओल

माझीही पलिकडे ओळख…

माजी नगराध्यक्ष चिमण डांगे व विश्वास डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा धागा पकडत जयंतराव पाटील म्हणाले, आमचे कार्यकर्ते निवडणूक घोषित झाल्यापासून विचारात होते, त्यांना मी म्हटले, माझीही पलीकडे ओळख आहे. जरा थांबा असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. आज यांचा प्रवेश झाला. येत्या आठ दिवसात आणखीन काहीजण येतील असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज केले.

Exit mobile version